विजय खातू

588

गणपती बाप्पाची मूर्ती आणि विजय खातू असे एक वेगळे नाते मागील चार-साडेचार दशकात निर्माण झाले होते. आकर्षक आणि देखण्या गणेशमूर्ती बनविणारे उत्कृष्ट मूर्तिकार महाराष्ट्रात खूप आहेत. मात्र विजय खातू यांचे वैशिष्टय़ वेगळेच होते. गणेशाच्या मूर्तीत, विशेषतः उंच गणेशमूर्तीत विजय खातू यांनी त्यांचा स्वतःचा वेगळा ठसा उमटविला होता. शेवटी गणेशमूर्ती ही फक्त सुबक, देखणी असून चालत नाही. गणेशभक्ताला तिच्यात एक जिवंतपणा, भाव दिसावा आणि जाणवावा लागतो. गणपतीचे डोळे हा त्या मूर्तीचा खरा ‘आत्मा’ असतो. विजय खातू मूर्ती बनविण्याची सर्व तंत्रे तर व्यवस्थित सांभाळतच, पण आपल्या गणेशमूर्तींना मूर्तरूपही देत. विशेषतः २५-३० फूट उंच मूर्ती बनवताना मूर्तीचा ‘तोल’ सांभाळणेही महत्त्वाचे असते. या सर्वच बाबी कौशल्याने हाताळल्याने मागील चार-साडेचार दशके गणेशमूर्ती म्हणजे विजय खातू असे एक नातेच निर्माण झाले होते. वडील रामकृष्ण यांच्याकडून मूर्तिकलेचे धडे त्यांनी लहानपणीच गिरवले. तो त्यांच्या घराण्याचा पिढीजात व्यवसायच होता. वडिलांसह त्यावेळचे प्रसिद्ध मूर्तिकार दीनानाथ वेलिंग, धर्माजी पाटकर यांच्याकडेही त्यांनी मूर्तिकलेचे शिक्षण घेतले. उंच, भव्य गणेशमूर्ती ही मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची आज जी ओळख बनली आहे. त्यात विजय खातू यांचा वाटा निश्चितच मोठा आहे. अर्थात मूर्तिकलेत ते स्थान मिळविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. मूर्तिकला किंवा उंच गणेशमूर्तींची निर्मिती हा त्यांचा व्यवसाय होता हे खरे असले तरी त्यांच्यातील अस्सल कलाकाराला अनेकदा श्री गणरायांची समुद्रात विसर्जन होताना आणि नंतर होणारी दुरवस्था अस्वस्थ करून जात असे. तसे ते बोलूनही दाखवत. असा हा देवाला घडविणारा ‘देवमाणूस’ होता. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना त्यांचे असे अचानक जाणे मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना चटका लावणारे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या