विजयकुमार गौतम यांची उचलबांगडी

28

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींच्या ऐतिहासिक कर्जमाफीत झालेल्या कमालीच्या गोंधळाचा फटका माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांना बसलाच. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर आता त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हंगामी नियुक्ती करण्यात आलेले एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे आता माहिती तंत्रज्ञान विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या साडेआठ लाख शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या यादीतच घोळ आढळला. ही यादी तयार करण्याचे काम आयटी विभागाकडे सोपविण्यात आले होते. २७ नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के शेतकर्यांना कर्जमाफी करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. आयटी विभागानेही रात्रंदिवस कंबर कसली. मात्र ऑनलाइन अर्जांचा डेटा फिड करताना झालेला आधार क्रमांकांचा घोळ सहकार आणि आयटी विभागाच्या चांगलाच अंगलट आला. याच पार्श्वभूमीवर आयटी घोटाळ्याचा आरोप करीत खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे आणि गौतम यांच्यावर निशाणा साधला. याची गंभीर दखल घेत विजय कुमार गौतम यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. यावर स्पष्टीकरण देताना विजय कुमार गौतम यांनी आपण वडिलांची तब्येत बिघडल्याने झारखंड येथे गेल्याचे सांगितले होते. त्यांच्या जागी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर नियुक्त असलेले अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांना हंगामी आणण्यात आले. मात्र आज अखेर श्रीनिवासन यांनाच कायम करीत आयटी विभागातून गौतम यांची उचलबांगडी करण्यात आली.

दहा आयएस अधिकार्यांच्या बदल्या

गौतम यांची नियुक्ती लेखा व कोषागार विभागाच्या प्रधान सचिव पदावर करताना या पदावरील श्रीमती वंदना कृष्णा यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा ) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील आर ए राजीव यांची वित्त विभागातच प्रधान सचिव (व्यय ) या पदावर बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी बी देसाई यांची मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षाचे संचालक म्हणून बदली करण्यात आली असून लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम एस गुरसाले यांची नागपूर येथे मनरेगाचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव एस डी मांढरे यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करताना त्यांच्या जागी आर डी निवतकर यांची बदली करण्यात आली आहे. मनरेगाचे आयुक्त एस जी कोलते यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या