मल्ल्या म्हणतोय मी ‘चोर’ नव्हेच!

23

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थानातील बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या हस्तांतराचे प्रकरण लंडनच्या वेस्टमिंस्टर न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मल्ल्या मंगळवारी न्यायालयात हजर झाला. सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना मल्ल्याने सर्व आरोप फेटाळून लावत ‘मी चोर नव्हेच’ अशा अविर्भावात उत्तरे दिली. ‘आपण निर्दोष आहोत’, असा दावा करत मल्ल्याने आपल्याकडे सर्व प्रकरणाचे पुरावे असल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाने मल्ल्याला ४ डिसेंबरपर्यंत जामीन दिला आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलैला होणार आहे.

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्याला मल्ल्याने हजेरी लावली होती. त्यावेळी हिंदुस्थानी प्रेक्षकांनी मल्ल्याची चोर आला चोर आला अशी हुर्रै उडवली होती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, ‘ओव्हलच्या मैदानावर मला कोणी चोर म्हटले नाही. फक्त काही दारूडे त्या ठिकाणी धिंगाणा घालत होते’; असे मल्ल्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या