पालकमंत्री बापट यांना सत्तेची मस्ती आलीय- विजय शिवतारे

पुणे – ‘माझ्या मतदारसंघातील तीन प्रभाग पुणे शहरात येत असतानादेखील पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांनी मला जाणीवपूर्वक डावलले आहेे,’ असे सांगतानाच, बापट यांना सत्तेची मस्ती आली आहे. बापट आणि त्यांचे काही कंपू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशाभूल करीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल असे बापट वागत असल्याची बोचरी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
शिवतारे म्हणाले, मेट्रोच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमपत्रिकेत माझे नाव का वगळले? अशी विचारणा मी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना केली. त्यावर निमंत्रणपत्रिका ही पालकमंत्र्यांचा विषय असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघातील तीन प्रभाग पुणे शहरात येत असतानादेखील पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांनी मला जाणीवपूर्वक डावलले आहेे. बापट यांना सत्तेची मस्ती आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना युती हवी. मात्र, पुण्यात नको. बापट आणि त्यांचा काही चमू मुखमंत्र्यांची दिशाभूल करीत आहे, अशी टीकाही केली. पुरंदर विमानतळाबाबत काँग्रेस राजकारण करत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर विमानतळाला पाठिंबा दिला आहे. मात्र, काँग्रेसचे दत्ता झुरंगे काही शेतकर्‍यांना हाताशी घेऊन पुरंदर विमानतळाविरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलन करणारे जमिनीचे खरेदी-विक्री करणारे ब्रोकर आहेत. मात्र, विमानतळ करताना शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही. शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊनच विमानतळ करण्यात येईल. खेडमध्ये जमिनीत गुंतवणूक करणार्‍या काही धनदांडग्या व्यक्तींनी पुरंदरमध्ये विमानतळ होऊ नये म्हणून पुरंदर तालुक्यातील काही व्यक्तींना सुपारी दिल्याचा आरोपही शिवतारे यांनी केला आहे.