युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करणार – विजय वडेट्टीवार

सध्या रशिया व युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असून रशियाने युक्रेनविरोधात सैन्य कारवाई केली आहे. राज्यातील अंदाजे 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील 300 विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी तसेच नागरिकांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील अंदाजे 1200 विद्यार्थी अडकले असून 300 विद्यार्थ्यांनी पालकांशी सपंर्क साधला असल्याची माहिती नुकतीच मिळाली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावरही संकलित करण्याचे काम सुरू आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी हेल्पलाईन नंबर जाहिर केलेले आहेत. राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल तसेच व्हॉटस क्रमांक 9321587143 आणि [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा.

विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील किती लोक अडकले आहेत याची माहिती विभाग घेत आहे. तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे. जी जी मदत हवी असेल त्या मदत देण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. कदाचित युक्रेनमधून विमान उड्डाण होणार नसेल तर शेजारच्या देशातून विमान उड्डाणासाठी तयारी करण्यात येत आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर संकलित करण्याची तयारी आम्ही केली आहे. काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील क्रमांक देण्यात आले आहेत.

टोल फ्री – 1800118797
फोन 011-23012113 / 23014104 / 23017905
फॅक्स 011-23088124
ईमेल [email protected] या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.