पुण्यात ड्रग्ज रॅकेट फोफावतेय, तरुण पिढी बरबाद होत असताना प्रशासन नक्की काय करतेय? रेव्ह पार्टीवरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरालगतच्या तुळापूर परिसरातील एका फार्महाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाड टाकली. यावेळी अनेक तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. या रेव्ह पार्टीत 156 तरुण तरुणी आढळून आलेले असताना फक्त 78 जणांवर एफआयआर का दाखल करण्यात आला आहे, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

”पुण्याच्या रेव्ह पार्टीमध्ये १५६ तरुण-तरुणी असताना केवळ ७८ जणांवरच एफआयआर का? उरलेल्या ७८ जणांना रात्रीतून कुणाच्या सांगण्यावरून सोडले? त्यातही धक्कादायक म्हणजे, तिथे ड्रग्जचा उघड वापर झाला असताना फक्त २९ लोकांचीच अमली पदार्थांची चाचणी का केली गेली? पैशांच्या जोरावर श्रीमंतांच्या पोरांना अलगद बाहेर काढायचे आणि कारवाईचा बडगा फक्त गरिबांच्या मुलांवरच उगारायचा, हा कुठला न्याय? संपूर्ण १५६ जणांवर गुन्हा दाखल का झाला नाही, याचे उत्तर गृहखात्याने दिलेच पाहिजे. पुण्यात ड्रग्ज रॅकेट फोफावत असताना आणि तरुण पिढी बरबाद होत असताना प्रशासन नक्की काय करत आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

यासोबतच ”प्रशासनाचा आणि पोलिसांचा हात असल्याशिवाय अशा पार्ट्या पुण्यात घडूच शकत नाहीत. हा केवळ हलगर्जीपणा नसून ड्रग्ज माफियांना दिलेले मूक समर्थन आहे.त्या रात्री कोणाकोणाचे फोन आले आणि कुणाच्या दबावामुळे कारवाई अर्धवट सोडण्यात आली, याची तात्काळ चौकशी झालीच पाहिजे!” अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.