सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेत मिंधे-भाजप सरकारविरोधात संताप आहे. महाराजांच्या या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये करण्यात आलं होतं. राज्यभर यासंदर्भात आंदोलनं सुरू आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली.
मात्र या माफीवरून राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान यांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार यांनी X वर पोस्ट केलं आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्यानंतर पाच दिवसांनी महाराष्ट्रात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान यांनी आज शिवप्रेमींची माफी मागितली. पण पुतळा कोसल्यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले ताशी 45 किमी वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला.ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकार फरार आहे,कारवाई नाही. मंत्री केसरकर म्हणाले काही तरी चांगले व्हायचे असेल म्हणून पुतळा कोसळला असेल.सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असताना पुतळा प्रकरणी बोटं नौदलाकडे दाखवले!’
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्यानंतर पाच दिवसांनी महाराष्ट्रात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान यांनी आज शिवप्रेमींची माफी मागितली.
पण पुतळा कोसल्यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला.ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकार फरार…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 30, 2024
‘पंतप्रधान यांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता तर त्या माफीवर विश्वास बसला असता. पण कृतीत काहीच नाही, फक्त पोकळ शब्द आहेत!’, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फक्त माफी मागितली का, असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.