राष्ट्रवादीने महिला आयोगाची पत्रकार परिषद उधळली

13

सामना प्रतिनिधी । नागपूर

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसने उधळून लावली आहे. नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्था पार ढासळलेली आहे आणि महिला या शहरात बिलकुल सुरक्षित नाहीत असा आरोप करीत ढोल वाजवून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद उधळून लावण्यात आली.

नागपूरच्या रविभवन शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची महिला तस्करीवरील प्रस्तावित अंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती देण्यासाठी पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही पत्रपरिषद सुरू झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाओ आंदोलन केले. ढोल वादनाच्या आवाजाने पत्रपरिषदेत बोलणे अशक्य झाले तेव्हा विजया रहाटकर उठून बाहेर गेल्या आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

rhatkar-pc

महिलांवर शहरात होणारे अत्याचार आणि या प्रकरणात पोलिसांची उदासिनता या मुद्यावर मीही आपल्याशी सहमत आहे आणि आपण प्रत्येक प्रकरणाची सविस्तर माहिती द्या, मी पोलिसांशी स्वतः चर्चा करते आणि कारवाईचा आग्रह धरते असे रहाटकर यांनी स्पष्ट केल्यावरही आंदोलकांचे समाधान झाले नाही. शेवटी विजया रहाटकर यांनी सभागृहात येत पुन्हा पत्रकार परिषद सुरू केली. हे बघून आंदोलनकर्त्या राष्ट्रवादी काँगेसच्या नागपूर शहर महिला अध्यक्ष अलका कांबळे या स्वतःच ढोल हातात घेवून वाजवत सभागृहात घुसल्या. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या