विजया राजाध्यक्ष

392

प्रशांत गौतम

साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कारानंतर महत्त्वाचा समजला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार यंदा विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला आहे. मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या वाढदिवसानिमित्ताने जनस्थान पुरस्काराचे वितरण२७ रोजी नाशिकमध्ये होणार आहे. बा.सी. मर्ढेकर यांच्या साहित्याच्या विशेष अभ्यासक असलेल्या विजयाबाईंचा सहा दशकांचा लेखन प्रवास बहुआयामी राहिलेला आहे. व्यासंगी समीक्षक, उत्तमोत्तम कवितांच्या आस्वादक, कथाकार आणि ललित लेखिका ही त्यांची ओळख आहे. अधांतर, टिंबे, विदेही, अनोळखी, अकल्पित, पारंब्या, लँडिंग, उघडमीट, कमान, चैतन्याचे ऊन, पांगारा, हुंकार, दोनच रंग, अखेरचे पर्व, अनामिक यासारखे त्यांचे कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्या कथालेखनाचे विश्व हे प्रामुख्याने मध्यमवर्गीयांचे आणि त्यातही उच्च मध्यममवर्गीयांचे राहिले आहे आणि त्यातही विशेष म्हणजे कथालेखनाच्या केंद्रस्थानी आहे ती ‘स्त्री’. या स्त्रीला  स्वतःविषयी एक स्त्री देह म्हणून आणि त्यामागच्या स्त्रीच्या विषयीचे प्रचंड कुतूहल आहे. पु.भा. भावे, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांचे कथालेखन जोमदार असल्याच्या काळात विजयाताईंनी नवकथा आपल्या शैलीदार लेखनाने बहुपदरी केली. त्यांच्या कथालेखनात अगदीच क्रांतिकारी बदल दिसणार नसले तरी त्या बदलत्या समाजजीवनाचे आकलन करतात. कथा, काव्य निवेदनासोबत त्यांच्या ‘परतीचा वारा’ या ललित लेखनात आपल्या माहेरच्या म्हणजे कोल्हापूरच्या आठवणी सांगतात. ललित लेखनाचे खरे मर्म काय असते याविषयी त्या म्हणतात, लालित्याचे अंग व वाचकांशी संवाद साधण्याची उत्सुकता असते, अशा प्रकारच्या ललित गद्य लेखनास लेखकांजवळ व्यासंग आणि समृद्ध व्यक्तिमत्त्व असले पाहिजे. कथा, कविता आणि ललित लेखन या क्षेत्रातील लेखन प्रवासानंतर त्यांनी समीक्षा क्षेत्रात लेखन केले. कवितारती, जिव्हार स्वानंदाचे, संवाद- तीन ज्येष्ठ साहित्यिकांच्या मुलाखती, आदिमाया, विंदा करंदीकरांच्या प्रेमकवितांचे संपादन, मर्ढेकरांची कविता; स्वरूप आणि संदर्भ-दोन खंड, करंदीकरांचा समग्र लघुनिबंध आणि संपादन त्यांनी केले. विशेषतः मर्ढेकरांच्या साहित्यावर विजयाताईंनी पीएच.डी. केली आणि त्यातील अभ्यासानंतर दोन खंडांच्या साहित्यकृतीतून विस्ताराने मांडला. कथालेखनात निसर्गातील प्रतिमा अधिक प्रमाणात व जाणीवपूर्वक दिसतात. अलीकडच्या काही कथालेखनात तर कथांमधील निवेदन हे अधिक सरळ आणि त्यातील नाटय़ हे थेट भिडणारे असते. कथेमधील पात्रे ही हळव्या मनाची असतात आणि त्यांच्याकडे सत्य स्वीकारण्याची कलात्मक तटस्थता जास्त असते. विजयाताईंनी कथेसोबत काही कविताही लिहिल्या, परंतु त्या फार प्रकाशझोतात आल्या नाहीत. असे असले तरी महाविद्यालयीन वाटचालीपासून चांगल्या कवींच्या दर्जेदार कविता वाचल्या, अभ्यासल्या आणि आस्वादल्याही. मग ते कृ.ब. निकुंब असतील, कवी अनिल असो किंवा इंदिरा संत असतील, चांगल्या कवितांच्या वाचन आणि रसास्वादामुळे त्यांच्यातील ललित लेखक आणि समीक्षक यांचीही समांतर वाट सुरू झाली. ललित लेखन साहित्यकृतीत कदंब, अवतीभवती, स्वच्छंद, तळय़ात मळय़ात, अनुबंध यासारख्या लेखनाचा समावेश होतो. विजयाबाईंच्या एकूणच ललित लेखनात जीवनविषयक अनुभवांची समज दिसते. त्यात मानवी वर्तन व भावासंबंधीची जाण हे अर्थपूर्ण आणि पूर्ण आविष्कारातून मांडण्यात आले आहे. कदंब या ललित लेखनातील लेखन भूतकाळाशी निगडित असले तरी ते वर्तमानकाळाशीही निगडित आहे. तसे ते वर्तमानकाळाशीही निगडित आहे. ते या ललित लेखनात वि.स. खांडेकर यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देतात. कोल्हापूर हे त्यांचे माहेर. विजया आपटे या नावाने त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे. तेथील वास्तव्यात त्यांना ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई यांच्यासारख्या दिग्गजांचा सहवास लाभला. राजाराम महाविद्यालयात आणि घरी वाचनाचे उत्तम संस्कार झाले. वेगळय़ा लेखनामुळे राम पटवर्धन, श्री. पु. भागवत, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निमित्ताने ‘सत्यकथा’ व ‘मौज’ परिवार जोडला गेला. त्यातील विजयाताईंचे लेखन जाणकार, अभ्यासकांच्या मनात भरले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आजपर्यंत कुसुमावती देशपांडे आणि शांताबाई शेळके यांनाच मिळाले. त्यानंतरच्या प्रदीर्घ काळानंतर २००१ साली इंदूर येथे ७४ वे साहित्य संमेलन भरले होते. त्याच्या अध्यक्षपदाचा सन्मान विजयाबाईंना लाभला, त्यानिमित्ताने त्या साहित्य संमेलनाच्या तिसर्या महिला अध्यक्षा ठरल्या. आज या लेखन प्रवासाचा सन्मान जनस्थान पुरस्काराने होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या