अपूर्वाईची थंडी

85

नमिता दामले

जरा कमी थंडी असलेल्या ठिकाणीही जाऊन पाहूया…

थंडी… थंडी… थंड हवेची ठिकाणं ही प्रसिद्ध आहेतच. पण कमी थंडीची ठिकाणं… अगदी थोडीफार का होईना तिथेही थंडी असतेच की… आणि तिच्या या कमी असण्याने तिथल्या समाजजीवनाला या थंडीची खूप अपूर्वाई असते. आपण दक्षिणेकडे निघालो की समुद्राचा खारा वारा थंडीची तीक्रता कमी करतो. त्या खाऱया वाऱयाचे बोचरेपण थंडीत एक वेगळाच रंग भरते. हवीहवीशी वाटणारी ही कमी थंडी खूप कोडाकौतुकाची असते. जशी मुंबईची थंडी. तापमानाचा पारा जरा जरी खाली उतरला की मुंबई अगदी गारठूनच जाते. अशीच काही तुलनेने कमी थंडीची पर्यटनस्थळे पाहूया…

कर्नाटकातील हम्पी, बदामी, पट्टडकल, रोहोळ या स्थळांचे थोडक्यात वर्णन स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्चर असे केले जाते. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी या वस्तूंचे, शिल्पांचे निर्माण केले गेले. बदामीची लेणीही वैभवशाली शिल्पकृतींच्या नकाशावरील एक तेजस्वी स्थान आहे. या दोन्ही नगरी अतिशय निसर्गरम्य अशा परिसरात वसलेल्या डोंगरांनी वेढलेल्या आहेत. या सहलीला जोडून विजापूरचा गोल घुमट व किल्ला याही मुद्दाम अर्धा दिवस खर्च करून बघण्यासारख्या उत्तम वास्तू आहेत. येथील पर्यटन डोळस करण्यासाठी गाइडची मदत घेणे अतिउत्तम.

दांडेली अभयारण्य – दांडेली येथील पक्षी व वन्यजीव अभयारण्यात फिरताना घनदाट जंगलामध्ये ऐकू येणारे कर्णमधुर आवाज, जंगली वनस्पतींचा, झाडांचा दरवळणारा सुगंध, जमिनीवर पसरलेले लांबच लांब फुलापानांचे गालिचे असे सर्व अनुभव एकत्र मिळतील. पहाटे जीपमधून बसून जंगलसफारी करावी. दुपारनंतर निवांत भटकत पक्षीनिरीक्षण करावे. वनखात्याने जंगलात उभारलेल्या तंबूंमध्ये ऐसपैस राहावे. मुलांनी मोठय़ा माणसांनी एकत्र येऊन काही खेळ खेळावे असे हे निवांत ठिकाण आहे. दांडेलीचे अभयारण्य हरणे, हत्ती, शेकरू, खार, हॉर्नबिल अशा अनेक प्राणीपक्षांना आश्रय देऊन आहे. तसेच दांडेलीजवळचे सिंथेरी रॉक्स व क्रोकोडाइल पार्क हीदेखील प्रेक्षणीय स्थळे अवश्य भेट देण्यासारखी आहेत.

विजयदुर्ग – विजयदुर्ग किल्ल्याची रचना, किल्ल्याची तटबंदी, गोडय़ा पाण्याची विहीर, भुयारी मार्ग, मंदिर अशी अनेक गोष्टींमुळे हा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. विजयदुर्गाची बांधणी ११व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजनी केली. कान्होत्री आंग्रे व तुळोजी आंग्रे यांचे किल्लेदार होते. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता नंतर तो इंग्रजी अमलाखाली आाला. किल्ल्यापासून साधारण तीन किमीवर शिवकालीन रामेश्वर मंदिर आहे. याची रचना वैशिष्टपूर्ण असून या मंदिरात जाण्यासाठी खोल उतरून जाणारी झाडांनी सावली धरलेली दगडी पायवाट आहे. वाडापडेल येथील व देवगकडे जाताना रस्त्याच्या बाजूलाच छोटीशी गुहा व तळे असलेले मंदिरही आवर्जून बघण्यासारखे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या