नागपूरच्या पोलीस आयुक्तांना निलंबित करा!: काँग्रेस

72

नागपूर – आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी गोळीबाराची जाहीर धमकी देण्याच्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास त्यांना जनरल डायरची पदवी देऊन सत्कार करणार असल्याची घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

नागपुरात आठवडाभरापूर्वी ‘हे राम नथुराम’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या नाटकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी जाहीर फलक लावून गोळीबाराची धमकी देण्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी हा फलक लावला होता. नथुरामचे नाटक आणि तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेसमोर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर जनरल डायरसारखी दडपशाही करण्याची नागपूर पोलिसांची मानसिकता दिसून आली होती, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला होता. हा प्रकार करणाऱ्या नागपूर पोलीस आयुक्तांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस करणार आहे.

२५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एखाद्या साध्या आंदोलनात गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक घेऊन पोलीस उभे असल्याचे मी कधीही पाहिले नाही. गृह खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी. नागपूर पोलीस आयुक्तांवर कठोर कारवाई करावी. – राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते

आपली प्रतिक्रिया द्या