राजकीय नेत्यांच्या लाडक्या गुंडांकडून हत्या, हत्येचा प्रयत्न

neta-leader

पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या काही पक्षांच्या लाडक्या गुंडांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. पोलिसांकडून आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई होत नसल्याने शैलेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी पाच दिवसांच्या आत एका तरुणाची हत्या तसेच अन्य तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजकीय पक्षांच्या दबावामुळे पोलिसांना संबंधित आरोपींवर कारवाई करता येत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांमधून सांगण्यात येते.

शैलेश गायकवाड हा पार्क साईट पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुंड आहे. सातत्याने तो गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार होती. शिवाय त्याला तडीपारदेखील करण्यात येणार होते. परंतु राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकून तशी कारवाई करू देण्यात आली नव्हती. त्यामुळे शैलेश व त्याचे साथीदार मोकाट सुटले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते. 6 तारखेला शैलेश व त्याच्या साथीदारांनी सनी बोर्डे या तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सनी याने तक्रार दिल्यानंतर पार्कसाईट पोलिसांनी शैलेशसह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. हे आरोपी पोलीस कोठडीत असताना त्यांचा आणखी एक कारनामा समोर आला. विक्रोळी परिसरात काही क्लिप व्हायरल झाल्या. एका क्लिपमध्ये शैलेश व त्याचे गुंड साथीदार एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत असून दुसऱ्या क्लिपमध्ये आरोपी त्या तरुणाला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहेत. या क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह कसारा घाटात आढळल्याचे समोर आले. त्यामुळे शैलेश व त्याच्या साथीदारांविरोधात हत्येचा गुन्हादेखील दाखल झाला आहे. पोलीस तपासात 2 तारखेला शैलेश व त्याच्या गुंडांनी त्या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकल्याचे समोर आले.