Vikram Gokhale रत्नागिरीत आणखी एक चित्रपट चित्रीत करण्याचे विक्रम गोखलेंचे स्वप्न अधुरेच

दुर्गेश आखाडे

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर रत्नागिरीत चित्रीत झालेल्या ‘सोहळा’ चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आठवडाभर रत्नागिरीमध्ये थांबून विक्रम गोखलेंनी ‘सोहळा’ चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. यावेळी रत्नागिरीच्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात ते पडले. रत्नागिरीत आणखी एक चित्रपट करण्याची त्यांची इच्छा होती. त्याची तयारी सुरु झाली होती. निर्माते सुरेश गुंदेचा आणि के. सी.बोकाडीया यांनी रत्नागिरीत हिंदी चित्रपट करण्याचे नियोजित केले होते. मात्र कोरोनामुळे ते बारगळले आणि आणखी एक चित्रपट रत्नागिरीत चित्रीत करण्याचे अभिनेते विक्रम गोखले यांचे स्वप्न अर्धवट राहिले.

2017 मध्ये अरिहंत ग्रुपने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत के. सी. बोकाडीया यांच्यासोबत मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे नाव होते ‘सोहळा’. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर चित्रपटाचे निर्माते सुरेश गुंदेचा यांच्या ‘सोहळा’ चित्रीकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

सुरेश गुंदेचा म्हणाले की, आम्ही पहिलाच मराठी चित्रपट करताना अभिनेते विक्रम गोखले यांना घेण्याचे आम्ही निश्चित केले होते. दिग्दर्शक आणि आमचं विक्रम गोखले यांच्या नावावर एकमत झाले होते. सोहळा चित्रपटात विक्रम गोखले यांनी सासऱ्याची भूमिका बजावली आहे. त्यांच्यासोबत चित्रपट करताना एक जबरदस्त अनुभव आम्हाला आला. असा माणूस आणि अभिनेता पुन्हा होणार नाही.

आई-वडिलांपासूनच त्यांना अभिनयाचा वारसा होता. रत्नागिरीमध्ये आठ दिवस त्यांनी चित्रीकरण केले. चित्रीकरणादरम्यान ते आपली भूमिका अगदी सहजगत्या करायचे. रत्नागिरीतील निसर्ग सौंदर्य त्यांना खूप आवडले होते. आरेवारे येथे एका दृष्याचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी तेथील समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्य पाहून ते त्याच्या प्रेमातच पडले. त्यामुळे आणखी एक चित्रपट रत्नागिरीत करुया अशी त्यांची इच्छा होती. आम्हीही त्यासंदर्भात तयारी सुरु केली होती. के.सी.बोकाडीया यांच्यासोबतच एक हिंदी चित्रपट रत्नागिरीत करायचा असे आम्ही निश्चित केले होते. त्यामध्ये आम्ही अभिनेते विक्रम गोखले यांनाच घेणार होतो. पण दुर्दैवाने कोरोनाचे संकट आले आणि आमचे हिंदी चित्रपटाचे नियोजन बारगळले, अशी खंत सुरेश गुंदेचा यांनी व्यक्त केली. त्यानंतरही अभिनेते विक्रम गोखले आणि आमचा संपर्क सुरु होता. बोलणेही व्हायचे, अशी आठवण सुरेश गुंदेचा यांनी सांगितली.

अरिहंत ग्रुपचे मुकेश गुंदेचा यांनी चित्रिकरणा दरम्यानचा एक अनुभव सांगितला. चित्रिकरण सुरू असताना मुकेश गुंदेचा आपल्या मित्रांना घेऊन अभिनेते विक्रम गोखले यांना भेटायला गेले .तेव्हा ओळख करून देण्यापूर्वीच विक्रम गोखले म्हणाले की, मी आधी माझी ओळख करून देतो. मी विक्रम गोखले. एक सामान्य माणूस आणि अभिनेता आहे. हा त्यांचा साधेपणा पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो असे निर्माते मुकेश गुंदेचा म्हणाले.