शहीद विलास शिंदे हत्येप्रकरणी अहमद कुरेशी दोषी, आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता

848

मुंबईच्या सत्र न्यायालयाने अहमद कुरेशी नावाच्या आरोपीला वाहतूक पोलीस दलाचे हवालदार विलास शिंदे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्याला शिक्षा काय द्यायची याचा निर्णय न्यायालय शनिवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. ऑगस्ट 2016 साली विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन बाईकस्वाराला अडवलं होतं. हेल्मेट नसल्याने शिंदे यांनी त्याला रोखलं होतं. या मुलाचं आणि शिंदे यांचं भांडण झालं होतं. हा मुलगा रागारागाने तिथून निघून गेला आणि त्याने त्याच्या भावाला बोलावलं होतं. त्याचा भाऊ म्हणजेच अहमद कुरेशी हा बांबू घेऊन आला आणि त्याने भावाच्या मदतीने शिंदे यांना बेदम मारहाण केली होती.

खार भागातील हॉटेल राजस्थानजवळ असलेल्या एका पेट्रोलपंपाशेजारी शिंदे यांनी या मुलाला अडवलं होतं. त्यांनी मुलाच्या बाईकच्या चाव्या काढून घेतल्या आणि पालकांना बोलवायला सांगितलं होतं. यावरून भडकलेल्या मुलाने शिंदे यांना धडा शिकवण्यासाठी त्याच्या भावाला बोलावलं होतं. अहमद कुरेशी याने आणि त्याच्या भावाने शिंदे यांच्या डोक्यात बांबूने वार केले होते आणि छातीवर लाथही मारली होती. वार वर्मी बसल्याने शिंदे जागीच कोसळले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र ते कोमात गेले आणि नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटना घडली तेव्हा कुरेशीचा भाऊ 16 वर्षांचा होता. यामुळे त्याच्यावर बालगुन्हे न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी फेटाळल्याने त्याच्यावर सज्ञान म्हणूनच वेगळा खटला चालवण्यात येत आहे. ऑक्टोबर 2016 साली खार पोलिसांनी अहमद कुरेशी आणि त्याच्या भावाविरोधात 700 पानांचे आरोपपत्र दाखल केलं होतं. ज्यामध्ये 50 प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही दृश्ये यांचा तपशील देण्यात आला होता. शिंदे कोसळल्यानंतर आणि अहमद आणि त्याचा भाऊ पळून जात असतानाचीही दृश्ये पोलिसांना मिळाली होती. भक्कम पुरावे असल्याने न्यायाधीशांनी अहमदला दोषी ठरवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या