विकासाच्या अगदी उंबरठ्यावर असलेल्या गावातील लोकांची पाण्यासाठी वणवण

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

जेएनपीटी आणि उरण शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सिडको हद्दीतील गावाना पाणीटंचाईने ग्रासले असून हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी या गावातील लोक चार-पाच किलोमीटर पायपीट करत सिडको ट्रेनिंग सेंटर जवळच्या एका फुटक्या व्हॉल्व्ह मधून पाणी भरण्यासाठी रोज गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

विकासाच्या नावाखाली उरण तालुक्यातील बहुतांश जमिनी या सिडको आणि जेएनपीटीने संपादित केल्या. या जागांवर मोठ मोठाले प्रकल्प आणि उंचच उंच इमारती बांधण्यात आल्या. सिडकोने या उंच इमारतींवर पाणी पोहचविले. मात्र ज्या ग्रामस्थांनी या प्रकल्पांसाठी आणि इमारतींसाठी आपल्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या त्या गावात मात्र हंडाभर पाण्यासाठी लोकांची वणवण करावी लागत आहे. डोंगरी, पाणजे, फुंडे, बोकडविरा या गावातील नागरीक चार-पाच किलोमिटर पायपीट करीत किंवा आपल्या दुचाकी आणि सायकली घेऊन बोकडविरा गावाजवळील सिडको ट्रेनिंग सेंटर जवळ फुटक्या पाईप मधून गळणारे पाणी भरण्यासाठी गर्दी करत आहेत. या सर्व गावातील लोकांकडे जरी अर्थिक सुबत्ता आली असली तरी हंडाभर पाण्यासाठी येथिल करोडपती व्यक्ती सुद्धा येथे लाईनमध्ये उभे राहत असल्याचे पहायला मिळते.

या गावांमध्ये सध्या एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा सूरू आहे. मात्र कमी दाबाने होणार पाणी पुरवठा आणि हे पाणी अशुद्ध असल्याने नागरीक हे पाणी इतर कारणांसाठी वापरतात. मात्र पीण्यासाठी या गावातील नागरीक सिडकोच्या हेटवणे धरणातील पाणी वापरतात. सिडकोने हेटवणे धरणाचे शुद्ध पाणी येथिल नव्याने तयार झालेल्या वसाहतींना आणले आहे. या वसाहतींना 24 तास हे शुद्ध पाणी सूरू असते. मात्र ज्या लोकांनी या इमारतींसाठी जागा दिल्या त्यांना मात्र अशुद्ध आणि अत्यंत कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे हे ग्रामस्थ बोकडविरा गावाजवळील ट्रेनिंग सेंटर जवळ पाणी भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र रोज इथे पहायला मिळते. या चारही गावांच्या हाकेच्या अंतरावर जेएनपीटी आहे. विकासाची कोट्यावधी रूपयांची कामे आजूबाजूला सूरू आहेत. बोकडविरा गावाजवळ साडेबारा टक्के योजनेच्या भूखंडावर नजर पोहचणार नाही अशा इमारती तयार होत आहेत. या इमारतींना 24 तास मुबलक पाणी मिळत असताना बाजूलाच असणाऱ्या या गावांतील लोकांना मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.