पाण्यासाठी तेलंगणा-महाराष्ट्र मार्गावर ठिय्या; तास भरापासून वाहतूक ठप्प, गावकरी आक्रमक

महाराष्ट्र तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेले गावकरी पाणीप्रश्नासाठी आक्रमक झाले आहेत. येथे सलग चार दिवसांपासून पाच गावातील नळांना कोरड पडली आहे. यातील काही गावांना नैसर्गिक पाण्याचे स्रोत नाहीत. परिणामी गावकरी नाल्यातील गढूळ पाण्याने तहान भागवत आहेत. हे गढूळ पाणीसुद्धा त्यांना फार लांबून आणावे लागत आहे.

या त्रासाला वैतागलेल्या गावकऱ्यांनी महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणाऱ्या सकमूर मार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मागील तासभरापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यात येणारी हेटी नांदगाव – चेकबापूर पाणी पुरवठा योजना गेल्या चार दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे हेटी नांदगाव, सकमुर, गुजरी, चेकनंदगाव, कुडेनांदगाव, टोलेनांदगाव या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे योजना ठप्प झाल्याच्या आरोप करत गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी केली.