डुकराची शिकार करता करता सापडला अजस्त्र बेडूक

सॉलोमन बेटावरील लोकांना नवजात बाळाच्या आकाराएवढा बेडूक सापडल्याने ते हादरले आहेत. या बेडकाचे वजन 1 किलोपर्यंत असून त्याची पायापासून डोक्यापर्यंतची लांबी ही 10 इंच (जवळपास 1 फूट) आहे.

सॉलोमन बेटावर राहणारा वखार मालक जिमी ह्युगो हा होनिआरा भागात डुकराची शिकार करत असताना त्याला हा बेडूक दिसला होता. या बेडकाचा आकार पाहून सॉलोमन बेटावरील गावकरीही हादरले आहेत. नवजात बाळाएवढा आणि जवळपास एक किलोचा बेडूक असू शकतो यावर मला दोन मिनिटं विश्वासच बसला नव्हता असं जिमी ह्युगोने म्हटलं आहे. माझ्या आयुष्यात पाहिलेला हा सगळ्यात मोठा बेडूक असल्याचं त्याने म्हटलं आहे.

या बेटावरील लोकं या बेडकांना झुडपातली कोंबडी म्हणतात, हे बेडूक पकडणं फार अवघड असतं असं त्यांचं म्हणणं आहे. जिमीसोबत असलेल्या शिकारी कुत्र्यांना हा बेडूक दिसला होता. मोस्टीन नावाच्या तिथल्या एका गावकऱ्याने हा बेडूक हातात उचलून धरल्यानंतर तो किती मोठा आहे याची सगळ्यांना कल्पना आली.

बेडकाच्या या प्रजातीला द कोर्नुफर गप्पी असं नाव आहे. हा बेडूक जगातला सर्वात मोठ्या बेडुकांपैकी आहे. बेडकाची ही प्रजाती दुर्मिळ होत चालली असून वाढतं वस्तीकरण हे त्याचे मूळ कारण आहे. कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिटर्जंट पावडरमधील रसायने या बेडकांच्या त्वचेसाठी हानीकारक असतात, ज्यामुळे हे बेडूक नामशेष व्हायला लागले आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या बेडकाला ‘गोलिएथ फ्रॉग’ म्हणतात जो द कोर्नुफर गप्पी बेडकाच्या आकाराच्या तीनपट असतो. गोलिएथ बेडकांचा आकार 32 इंचापर्यंत असतो आणि त्यांचे वजन 3.25 किलोपर्यंत असते.

आपली प्रतिक्रिया द्या