विनेश फोगाटला मोठा धक्का; रौप्य पदक नाही, क्रीडा लवादाने फेटाळले अपील

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीपटू विनेश फोगटला मोठा धक्का बसला आहे. वजनात वाढ असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र तिने रौप्य पदकासाठी क्रीडा लवादाकडे दावा दाखल केला होता. आता या प्रकरणाचा निर्णय आला असून क्रीडा लवादाने विनेशचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे तिला आता रौप्य पदक मिळणार नाही.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतून तिला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर सुवर्ण पदकाचा सामना खेळू द्यावा, या मागणीसाठी तिने केलेल्या अपील फेटाळण्यात आले होते. तसेच रौप्य पदक मिळण्याबाबतच्या अपीलावर 13 ऑगस्टला निर्णय दिला जाणार होता. त्यानंतर निर्णयाची तारीख 16 ऑगस्ट करण्यात आली होती. मात्र आता लवादाने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक विनेशने 6 ऑगस्ट रोजी सलग 3 सामने खेळून 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्य पदक निश्चित केले होते. सुवर्णपदकाचा सामना 7 ऑगस्टच्या रात्री होणार होता. पण त्याच दिवशी सकाळी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर विनेशने क्रीडा लवादाकडे अपील केले होते.

सुवर्णपदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, ही तिची मागणी होती. मात्र, त्यावेळी नियमांचा हवाला देत ही मागणी तात्काळ फेटाळण्यात आली. यानंतर विनेशने तिला या स्पर्धेत रौप्य पदक द्यावे, असे अपील केले. मात्र आता हे अपीलही फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे विनेशला आणि क्रीडा रसिकांना हा मोठा धक्का आहे.

भारतीय ऑलिम्पिक समितीने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या प्रकरणात युनायटेड वर्ल्ड रेसलिंग विरुद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टच्या लवादाकडे केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अर्ज फेटाळण्याच्या निर्णयावरही पीटी उषा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.