जुन्या इमारतींच्या दुरुस्तीमध्ये घोटाळे खपवून घेणार नाही!

39

सामना प्रतिनिधी, मुंबई

सिमेंटच्या इमारती असोत वा लाकडी, दोन्हींच्या दुरुस्ती खर्चात काहीच तफावत नसते. असे घोटाळे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तंबी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी आज म्हाडा अधिकाऱ्यांना दिली. जुन्या इमारतींच्या दुरुस्ती खर्चाची योग्य अंदाजपत्रके सादर करा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विनोद घोसाळकर यांनी सभापतीपदाचा कार्यभार गुरुवारी स्वीकारल्यानंतर आज जुन्या इमारतींची पाहणी सुरू केली. प्रभादेवी येथील 70 वर्षांपेक्षा जुन्या साखरवाला धनजी इमारतीला घोसाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या इमारतीची 1970 पासून पाच वेळा दुरुस्ती झाली. आताही संपूर्ण इमारतीला दुरुस्तीची आवश्यकता असताना फक्त चार गाळ्यांच्या दुरुस्तीसाठी नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रक काढले गेले आहे. घोसाळकर यांना ती माहिती मिळताच त्यांनी पुन्हा नव्याने योग्य अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश दिले.

रखडलेल्या इमारतींचे बिल्डर बदलण्यासाठी प्रयत्न
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात रहिवाशांना बिल्डरचे काम पसंत नसेल तर ते बिल्डर बदलू शकतात अशी तरतूद आहे. मुंबईत रखडलेल्या प्रकल्पांच्या बाबतीतही तसा निर्णय घेतला गेला पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. प्रकल्प रखडण्यामागे नोटाबंदी आणि जीएसटीमुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे 200 कोटींची मागणी
मुंबईतील जुन्या सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी 200 कोटी रुपये दिले जातील असे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पाठपुरावा करू असे घोसाळकर यांनी सांगितले. तसेच पुनर्विकासासाठी मालक आणि रहिवासी यांच्यात समन्वय साधण्यासाठीही प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.

summary- vinod ghosalkar speakes about redevelopment of residential buildings

आपली प्रतिक्रिया द्या