वांशिक उद्रेकाने धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याची चिन्हे नसून, शनिवारी कांगपोकपी जिह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात माजी आमदाराच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर, शुक्रवारी टेंगनौपाल जिह्यात अतिरेकी आणि त्याच समुदायाच्या गावातील ग्रामरक्षक स्वयंसेवकांमध्ये झालेल्या गोळीबारात तीन सशस्त्र व्यक्ती आणि एक अतिरेकी असे चारजण ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मोलनोम भागातील एका गावात शिरलेले युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे बंडखोर आणि ग्रामरक्षक यांच्यात शुक्रवारी रात्री चकमक उडाली. या वेळी दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात तीन ग्रामरक्षक आणि एक बंडखोर मारले गेले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी यूकेएलएफचे अध्यक्ष एसएस हाओकीप यांच्या घराला आग लावली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
माजी आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट
सायखुलचे कुकी समाजातील माजी आमदार यामथोंग हाओकीप यांच्या घराजवळ शनिवारी बॉम्बस्फोट झाला. या वेळी मैतेई समाजातील त्यांच्या पत्नी सपम चारुबाला या घराबाहेर साफसफाई करत असतानाच हा बॉम्बस्फोट झाला. जखमी सपम चारुबाला यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. हा बॉम्ब कोणी पेरला हे समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कुकी बंडखोरांचे तळ लष्कराने केले उद्ध्वस्त
मणिपूरमधील बंगलोन भागात कुकी बंडखोरांनी उभारलेले तळ लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उद्ध्वस्त केले. मणिपूरमध्ये अद्याप कुकी आणि मैतेईंमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरुच आहे. हिंसाचार उफाळून येऊ नये यासाठी लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाने गस्त वाढवली असून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे.