अराजकाच्या खाईत!

10

नोटाबंदीच्या निर्णयानंतर दहशतवाद नष्ट होईल असे जे सांगितले गेले त्या आश्वासनी थोतांडांची सालपटं निघाली आहेत. हजारपाचशेच्या नोटांमुळे काळा पैसा आणि दहशतवाद वाढला होता या भूलथापा कश्मीर आणि छत्तीसगढमध्ये उघड्या पडल्या आहेत. पुन्हा दोन हजारांच्या गुलाबी नोटांची नकली खाण रोज कुठेना कुठेतरी सापडत आहे. एकंदरीत सगळाच सावळागोंधळ सुरू असून छत्तीसगढ आणि कश्मीरचा हिंसाचार देशाला अराजकाच्या खाईत ढकलताना दिसत आहे.

अतिरेक्यांनी केलेला प्रत्येक हल्ला हा भ्याडच असतो, पण या भ्याड हल्ल्यात बळी जात आहेत ते आमच्या लष्करी जवानांचे, सामान्य नागरिकांचे आणि सीआरपीएफ जवानांचे. कश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराने उद्रेकाचे टोक गाठले आहे. तिथे आता महिला आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थिनींनी हाती दगड घेतले आहेत, तर छत्तीसगढमध्ये पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी भयंकर हल्ला करून २५ सीआरपीएफ जवानांचे बळी घेतले आहेत. नक्षलवाद्यांकडून दहशतवादी हल्ले वाढले आहेत. असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असे देशाच्या गृहमंत्र्यांकडून बजावले जात आहे. गेल्या महिनाभरात शंभरच्या आसपास सीआरपीएफ जवान मारले गेले. हे काही चांगल्या कायदा व सुव्यवस्थेचे लक्षण नाही. कश्मीरात व छत्तीसगढमध्ये रक्ताचे सडे पडत असताना आम्ही श्रद्धांजल्यांचे कार्यक्रम पार पाडून ‘राष्ट्रीय कर्तव्यास’ जागत आहोत. जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असे फक्त सांगून काय होणार? कश्मीरातील युद्ध परक्या अतिरेक्यांनी पुकारले व त्यांना पाकड्यांची मदत मिळते आहे, पण छत्तीसगढमध्ये तर पाकडे वळवळत नाहीत. मग त्या देशी अतिरेक्यांचा बीमोड करताना तुमचे हात का थरथरत आहेत? एका क्षणात पंचवीस जवान मारले जातात व आमचे राज्यकर्ते त्या सांडलेल्या

रक्ताचा सूड

घेऊ शकत नाहीत हे कसले लक्षण म्हणायचे? कश्मीरात हिंसाचाराचे अराजक उसळले आहे व तेथे जवानांवर हल्ले करण्यात महिलांनी पुढाकार घेतला आहे. कश्मीरातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. वास्तविक तिथे राष्ट्रपती राजवट लावून राज्य लष्कराच्या हाती सोपवायला हवे, पण मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती दिल्लीत येऊन पंतप्रधानांना भेटल्या व जाताना ‘अभय’ वरदान घेऊन गेल्या. कायदा व सुव्यवस्थेवरून जर दिल्लीने कश्मीरात राष्ट्रपती राजवट लावली तर तोच न्याय छत्तीसगढला लावावा लागेल. कश्मीर आणि छत्तीसगढसारख्या राज्यांमध्ये जवानांच्या बलिदानावर राज्यकारभाराचा गाडा हाकला जात आहे, पण आणखी किती जवानांचे बळी घेऊन राजशकट चालविण्याची हौसमौज आपण करून घेणार आहात? मूठभर नक्षलवादी देशाच्या निमलष्करी दलांना ‘चॅलेंज’ करत आहेत. गनिमी काव्याने खिंडीत गाठून जवानांच्या रक्ताचे सडे पाडत आहेत. लपूनछपून होणाऱ्या अशा भ्याड हल्ल्यांत लढण्याची संधी न मिळताच जवान धारातीर्थी पडत आहेत. हे कुठवर सहन करायचे? छत्तीसगढ, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतील

200 जिल्ह्यांत

नक्षलवाद्यांचे अमानुष तत्त्वज्ञान जाऊन पोचले आहे. शोषितांचा, वंचितांचा संघर्ष असे गोंडस नाव देऊन नक्षलींच्या रक्तरंजित कारवायांचे उदात्तीकरण करणाऱ्या मंडळींचाच खरेतर समाचार घेण्याची वेळ आता आली आहे. पुन्हा या मंडळींना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा एवढा पुरवठा कुठून होतो? देशाच्या सीमा ओलांडून स्वयंचलित बंदुका आणि दारुगोळा जंगलापर्यंत कसा पोहोचतो, हादेखील गंभीरच विषय आहे. नक्षलवाद्यांना रसद पुरवणारी ही सगळी बिळे बुजवणे, नक्षलींचे छुपे पाठीराखे जेरबंद करणे आणि जवानांच्या रक्ताला चटावलेल्या नक्षलवाद्यांचा निःपात करण्यासाठी धडक ऑपरेशन हाती घेणे, अशी त्रिसूत्री राबविल्याशिवाय नक्षलींचा नंगानाच थांबणार नाही. देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दहशतवाद नष्ट होईल असे जे सांगितले गेले त्या आश्वासनी थोतांडांची सालपटं निघाली आहेत. नोटाबंदीनंतर दहशतवाद जास्तच फोफावला हेच सत्य आहे. हजार-पाचशेच्या नोटांमुळे काळा पैसा आणि दहशतवाद वाढला होता या भूलथापा कश्मीर आणि छत्तीसगढमध्ये उघड्या पडल्या आहेत. पुन्हा दोन हजारांच्या गुलाबी नोटांची नकली खाण रोज कुठेना कुठेतरी सापडत आहे. एकंदरीत सगळाच सावळागोंधळ सुरू असून छत्तीसगढ आणि कश्मीरचा हिंसाचार देशाला अराजकाच्या खाईत ढकलताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या