एका दिवसासाठी महिलांचा टिवटिवाट बंद

19

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियामध्ये खूप ताकद असल्याने त्याचा वापर हल्ली मोठ्याप्रमाणावर केला जातो. एखाद्या विषयावर व्यक्त होण्यासाठी अथवा विरोध दर्शवण्यासाठी लोकं सोशल मीडियाचा अधिक वापर करतात. शुक्रवारी सकाळपासूनच जगभरातील अनेक देशांसह हिंदुस्थानातही ट्विटरवर #WomenBoycottTwitter ट्रेंड सुरू आहे. जगभरातील अनेक महिला याचं समर्थन करत एका दिवसासाठी ट्विटर सोडत आहेत. मात्र असं का याबाबत तुमच्या मनात ही प्रश्न निर्माण झाले असतील.

एका दिवसासाठी महिला ट्विटरवर नसण्याचं कारण ही तितकच महत्वाचं आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रोज मॅकगॉवनने ट्विटरवर प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हार्वी वाइंसटाइन विरूद्ध अनेक मोठे खुलासे केले. तसेच रोजने १९९७ मध्ये हार्वीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. हार्वीवर आरोप केल्यानंतर काहीवेळातच ट्विटरने रोज मॅकगॉवनंच अकाऊंट सस्पेंड केलं.

रोजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ट्विटवर अकाऊंट सस्पेंड केल्याची माहिती दिली. ट्विटरच्या पॉलिसीचं उल्लंघन होत असल्याने ट्विटरने अकाऊंट सस्पेंड केल्याचं तिने सांगितलं. मात्र एका दिवसानंतर ट्विटरने रोजच्या अकाऊंटवरील बॅन हटवला. त्यानंतर रोजने एकामागे एक ट्विट करत निर्माता-दिग्दर्शक हार्वेवर निशाणा साधला.

रोजचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर महिलांनी त्याला पूर्णपणे विरोध केला. तसेच ट्विटर ही सोशल नेटवर्किंग साइट स्त्री-पुरूषांमध्ये भेदभाव करते, असा आरोप महिलांनी केला. लैंगिक शोषणच्या विरोधात बोलल्यामुळे रोजचं अकाऊंट ट्विटरने सस्पेंड केल्याची बातमी काही वेळातच व्हायरल झाली आणि ट्विटरच्या विरोधात #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग ट्रेंड झाला. हिंदुस्थानातही शुक्रवारी सकाळपर्यंत हा हॅशटॅग टॉपवर होता.

आपली प्रतिक्रिया द्या