हिंदू देवतांची विटंबना क्लिप व्हायरल; हिंदुत्ववादी संघटनांचा धुळ्यात कडकडीत बंद

90

सामना प्रतिनिधी । धुळे

धुळे शहरातील समाजकंटक वसीम शेख याने हिंदू देव-देवतांची विटंबना करणारी क्लिप व्हायरल केल्यानंत संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी धुळे शहरात कडकडीत बंद पुकारला. आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने वसीम शेखची धिंड काढावी अशी मागणी करण्यात आली. त्याचवेळी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधातदेखील तरुणांनी घोषणा दिल्या. दरम्यान, आग्रा रोडसह शहराच्या अन्य भागातील सर्वच व्यावसायिकांनी आपली व्यापारी प्रतिष्ठानने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बहुसंख्य व्यापारी प्रतिष्ठानने सोमवारी बंद राहिली.

धुळे शहरात दोन दिवसांपूर्वी वसीम शेख नावाच्या तरुणाने हिंदू देव-देवतांबद्दल अपशब्द बोलत चित्रीकरण केले आणि ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. पांझरा काठावरील समाधी मंदिरात रविवारी रात्री बैठक झाली आणि सोमवारी बंद पुकारण्यात आला.

त्यामुळे सकाळी अनेक शाळा-महाविद्यालयांकडे विद्यार्थी गेले नाहीत. काही शाळा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बंदमुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षाचालक बाहेर पडले नाहीत. त्यामुळे साहजिकच शाळेत विद्यार्थी पोहोचले नाहीत. हिंदू देव-दैवतांचा अपमान झाल्याने शहरातील नागरिकांच्या भावना तीव्र होत्या. साहजिकच बहुसंख्य व्यावसायिकांनी व्यापारी प्रतिष्ठाने उघडली नाहीत. व्यवसाय बंद ठेवून आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात असे म्हणत शेकडो कार्यकर्ते आग्रा रोडवर आले. तरुणाई मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आग्रा रोडवर परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमक बंब आणि पोलीस प्रशासनातील वाहने तैनात करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख विश्वास पांढरे, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी आग्रा रोडवर फिरून परिस्थिती हाताळली. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शहरात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, शीघ्र कृती दलाच्या पाच तुकड्या, पंचवीस पोलीस अधिकारी, दोनशे कर्मचारी ठिकठिकाणी तैनात होते. या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख पांढरे यांनी सांगितले.

समाजकंटक वसीम शेख याने नशेमध्ये असताना ते कृत्य केले आहे. त्याच्या कृत्याचे कुणीही समर्थन करत नाही. पोलिसांनी त्याच्यासह एकाला ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी शांततेने आपल्या भावना व्यक्त कराव्यात. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कायम ठेवावी. आगळीक करणाऱ्यांच्या विरोधात सक्त कारवाई होईल. – विश्वास पांढरे, पोलीस प्रमुख

हिंदुत्ववादी संघटनांच्या बंद आणि आंदोलनास शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. देव-दैवत हा हिंदूंच्या अस्मितेचा भाग आहे. विटंबना करणाऱ्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे, पण त्याचवेळी शहरात पुन्हा दंगल होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी. या घटनेच्या मुळाशी कोण आहे याचा तपास पोलीस यंत्रणेने करावा. शहरासह जिल्हय़ातील बेकायदा कत्तलखान्यांची माहिती सामान्य माणसाला मिळते तीच माहिती पोलीस प्रशासनास का मिळत नाही. – हिलाल माळी (जिल्हाप्रमुख)

आपली प्रतिक्रिया द्या