कोरोनाबाधित सासऱ्यांना पाठिवर घेऊन सुनेने चालत गाठले हॉस्पिटल

सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोत एक महिला एका वृद्ध माणसाला पाठिवर उचलून नेताना दिसत आहे. अनेकजण या फोटोतील महिलेचं कौतुक करत आहेत. मात्र फोटोची वास्तवता वाचल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

हा फोटो गुवाहाटी येथे काढण्यात आलेला आहे. फोटोत दिसणाऱ्या महिलेचे नाव निहारिका दास असून तिच्यासोबत तिचे वृद्ध सासरे आहेत. सासरे थुलेश्वर दास यांची 2 जूनला तब्येत बिघडली. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनामुळे त्यांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. रुग्णवाहिका बोलावली असता रस्त्यावर खोदकाम सुरू असल्याने कोणतंही वाहन आत येण्यास तयार नव्हत. त्यात सासरे कोरोनाबाधित असल्याने त्यांना हातही लावायला कोणी तयार होईनात. सासऱ्यांना तर उभं राहण्याचीही शुद्ध नव्हती. अशा अवस्थेत त्यांना रुग्णालयात कसे न्यायचे ही चिंता निहारिकाला सतावत होती. तिचा पतीही दुसऱ्या ठिकाणी कामाला असल्याने ती घरात एकटीच होती.

सासऱ्यांचा जीव वाचवायचा असेल तर काहीतरी करायलाच हवे होते. अखेर निहारिकाने सर्व ताकद एकवटून सासऱ्यांना पाठीवर घेतले. त्यानंतर घरापासून दोन किमी अंतरावरील रिक्षा स्टँडपर्यंत तशीच ती चालत गेली. यावेळी अनेकांनी तिचे फोटो काढले. व्हिडीओ रेकॉर्ड केले मात्र तिच्या मदतीला कोणीच पुढे आले नाही. त्यानंतर एक रिक्षावाला तयार झाला व ती सासऱ्यांना कोरोना रुग्णालयात घेऊन गेली. मात्र तिथून त्यांना नगाव सिव्हिल रुग्णालयात न्यायला सांगितले. निहारीका त्यांना घेऊन नगाव सिव्हिल रुग्णालयात पोहोचली. तिथे सासऱ्यांना अॅडमिट केले.

सासऱ्यांच्या संपर्कात आल्याने रुग्णालयात निहारीकाचीही चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल प़ॉझिटिव्ह आला. तिलाही रुग्णालयात दाखल करुन घेतले. दरम्यान थुलेश्वर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना 5 जून रोजी गुवाहाटीच्या मेडीकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. मात्र 7 जूनला त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या