एका पोस्टसाठी विरारकरांचा लढा – न्यायालयात धाव

21

सामना प्रतिनिधी । वसई

मोबाईल, व्हॉट्स ऍप, फास्ट कुरियर, सोशल मीडियाच्या जमान्यात जेथे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून एका सेकंदात संदेश पाठवण्याचे हायटेक पर्याय उपलब्ध असताना विरारकारांनी मात्र एका पोस्टासाठी लढा उभारला आहे. विरार पश्चिमेला असलेले एकमेव टपाल कार्यालय गैरसोयींचे ठरत असल्यामुळे पूर्वेलाही टपाल कार्यालय सुरू करावे. या मागणीसाठी विरारकरांनी चक्क न्यायालयात धाव घेतली आहे.

विरार पूर्वेला असलेल्या टपाल कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे २०१३ ला त्याचे स्थलांतर पश्चिमेला करण्यात आले. मात्र पश्चिमेला असलेल्या या टपाल कार्यालयामुळे नागरिकांची गैरसोयच जास्त होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विरार पूर्व भाग मोठा असून येथील हजारो नागरिकांना रेल्वे स्थानक ओलांडून या सर्वांना पश्चिमेकडील टपाल कार्यालय गाठावे लागते. त्यात कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने स्पीड पोस्ट, पोस्ट बचत खाते, तिकिटे खरेदी अशा असंख्य कामांसाठी नागरिकांना तासनतास ताटकळावे लागते. विशेषतः याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो. पेन्शन व बचत ठेवीसाठी खासगी बँकाऐवजी पोस्टावरच जास्त विश्वास असल्यामुळे दररोज शेकडो ज्येष्ठ नागरिकांना टपाल कार्यालय गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

– एक वर्षापूर्वी नोटाबंदीनंतर विरार पश्चिम येथील टपाल कार्यालयात दहा हजार बचत खाती उघडण्यात आली होती. त्या व्यवहारासाठी रोजच खातेदारांना पायपीट करावी लागत आहे.
– विरार पश्चिम टपाल कार्यालयाला पोस्टमास्तरच नसल्याचे उघडकीस आले आहे. येथील पोस्टमास्तरची बदली मीरा रोड येथे झाली आहे.
– ऐन दिवाळीत एक महिला कर्मचारी दहा दिवस रजेवर गेली म्हणून स्पीड पोस्ट घेतले जाणार नाही, असे उत्तर तेथील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिले असल्याचेही समोर आले आहे.

तक्रारीला केराची टोपली

विरार पूर्वेला टपाल कार्यालय सुरू करावे यासाठी मुंबई मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र या तक्रार, विनंती, अर्जाला केराची टोपली दाखवत त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या