कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज, जावेद मियाँदादकडून कौतुक

14

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

‘टीम इंडिया’चे रनमशीन अर्थात विराट कोहली सध्या विक्रमांचे इमले रचत आहे. जबरदस्त कामगिरीमुळे त्याच्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र आता या यादीत चक्क पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याचेही नाव आले आहे. स्वतः जावेद मियाँदादने विराट कोहली अलौलिक क्रिकेटपटू असून जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे सांगत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीत नाबाद १६० धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीची जावेद मियाँदादने तोंडभरून स्तुती केली. तो म्हणाला, कोहलीचे फलंदाजीतील अफलातून तंत्र आणि ‘टीम इंडिया’ला कठीण परिस्थितीतूनही विजयाकडे घेऊन जाण्याची कला त्याला एक महान फलंदाज बनवते. विशेष म्हणजे त्याच्या कामगिरीत सातत्य आहे. समोरील गोलंदाजाचे सामर्थ्य आणि कमकुवत गोष्टी हेरून कोहली आपल्या फलंदाजी शैलीत तसा बदल करतो. त्यामुळेच विराट कोहली एक अलौलिक खेळाडू असून जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे’, असे मत जावेद मियाँदादने व्यक्त केले.

  • ‘विराट’ पराक्रम
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कारकीर्दीतील ३४ वे एकदिवसीय शतक झळकाविणाऱ्या विराट कोहलीने कर्णधार म्हणून १२ वे शतक ठोकले. ही उपलब्धी मिळविणारा तो हिंदुस्थानचा पहिला कर्णधार ठरला. त्याने सौरभ गांगुलीच्या कर्णधार म्हणून ठोकलेल्या ११ शतकांचा विक्रम मोडीत काढला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगने सर्वाधिक २२ शतके झळकावली आहेत.
  • विराट कोहलीने केवळ २०५ सामन्यांत ३४ शतके झळकावली आहेत, तर विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३४ शतके करण्यासाठी २९८ सामने खेळले आहेत.
  • खेळपट्टीवर धावून १०० धावा करणारा तो पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरला हे विशेष. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.
  • विराटने वन डेमधील १०० वा षटकार लगावला. यावेळी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट हा महेंद्रसिंग धोनी (२१६) व रोहित शर्मा (१६५) यांच्यानंतरचा तिसरा हिंदुस्थानी ठरलाय.
आपली प्रतिक्रिया द्या