विराटचे मैदानाबाहेरही ‘शतक’, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेट खेळाडू

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानात आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. तसेच मैदानाबाहेरही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकताच त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. मात्र हा विक्रम त्याने मैदानात नाही तर मैदानाबाहेर केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर विराटचे 100 मिलियन (10 कोटी) फॉलोअर्स झाले आहेत, आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेट खेळाडू आहे.

100 मिलियन फॉलोअर्स असलेला विराट कोहली 23 वा खेळाडू ठरला आहे. याआधी ज्या खेळाडूंनी 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे, त्यातील बहुतांश खेळाडू हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. या यादीमध्ये पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे, तर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनल मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांनाही 266 मिलियन फोलोअर्स आहेत. तिसऱ्या स्थानावर ब्राझिलचा खेळाडू नेम्यार असून त्याचे 147 मिलियन फॉलोअर्स आहेत.

प्रियांका चोप्राला मागे सोडले

दरम्यान, विराट कोहली याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला मागे सोडले आहे. प्रियांका चोप्रा हिचे 60 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर श्रद्धा कपूर हिचे 58 मिलियन फॉलोअर्स आहेत. या दोघी विराटनंतर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

कसोटी चॅम्पियनशीप ट्रॉफीच्या फायनलवर लक्ष्य

विराट कोहली सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. टीम इंडियाचा संघ 2-1 असा आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथा संघ 4 मार्चपासून अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना टीम इंडियाने जिंकला किंवा अनिर्णित राखला तरीही विराट ब्रिगेड कसोटी चॅम्पियनशीप ट्रॉफीच्या फायनलसाठी पात्र ठरणार आहे. मात्र हा सामना इंग्लंडने जिंकल्यास हे समिकरण बदलणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या