विराट नक्कीच अपयशावर मात करील! माजी श्रीलंकन कर्णधार जयवर्धनेचा विश्वास

टीम इंडियाचा स्टार  फलंदाज विराट कोहली सध्या अपयशाच्या गर्तेतून जात असला तरी अपयशावर मात करण्याची अपूर्व  क्षमता त्याच्याकडे आहे. तो लवकरच त्यातून बाहेर पडेल आणि पुन्हा त्याची बॅट तळपेल, असा विश्वास श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने व्यक्त केला आहे.

    यंदा ऑगस्टच्या अखेरच्या आठवडय़ात सुरू होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचे हिंदुस्थानी संघात पुनरागमन झाले आहे. कोहली कारकीर्दीत प्रथमच मोठय़ा कठीण कालखंडातून जात आहे. कोहलीने नोव्हेंबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही शतक झळकावलेले नाही. हिंदुस्थानी संघाच्या नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱयातही कोहली सहा डावांत केवळ 76 धावाच नोंदवू  शकला होता. त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या आणि आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले होते.

विराटने खेळपट्टीवर अधिक काळ टिकून राहावे

“विराट कोहलीच्या बाबतीत सध्या जे काही होत आहे ते दुर्दैवी आहे, पण तो गुणी खेळाडू आहे. कोहलीच्या खेळात दर्जा आहे आणि तो कायम टिकून असतो, अपयश तेवढय़ापुरतेच असते. यशासाठी त्याला जास्तीत जास्त सामने खेळायला मिळण्याची आणि त्याने खेळपट्टीवर अधिक काळ टिकून राहण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन जयवर्धने याने केले.