वर्ल्ड कप इंग्लंडला, पण…कोहली, बुमराहच टॉपवर

सामना ऑनलाईन, लंडन

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने रविवारी न्यूझीलंडला पराभूत केले. न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडला कडवी झुंज दिली, पण अखेर इंग्लंडचा संघ चौकार-षटकारांच्या निकषावर विजेता ठरला. पण असे असले तरीही आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह हेच अव्वल आहेत.

विश्वचषकानंतर आयसीसीने सर्वोत्तम 11 चा संघ जाहीर केला. या संघात विराट कोहलीला स्थान मिळाले नाही, पण तरीही आयसीसीच्या यादीमध्ये कोहलीच फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. विश्वचषकानंतर आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमधील खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीमध्ये कोहलीने 886 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हिंदुस्थानी उपकर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितच्या नावे 881 गुण आहेत.

आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह 809 गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आहे. याशिवाय विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करणारा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन हा अष्टपैलू क्रमवारीमध्ये अव्वल आहे. तर अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या