आयसीसी कसोटी क्रमवारीत स्मिथ अव्वल, विराट दुसऱ्या स्थानी

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावरुन मोठी झेप घेऊन विराट कोहली थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर विराटने फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ या यादीत ९३८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर असणारा विराट कोहली एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अव्वल स्थानी आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट ८७९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, हिंदुस्थानचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा ८७९ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन्स विलियम्स ८६५ गुणांसह यादीत पाचव्या स्थानावर आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने १५२.५० च्या सरासरीने ६१० धावा केल्या होत्या. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात विराटने नाबाद १०४ धावा केल्या. नागपूरमध्ये त्याने २१३ धावा केल्या. दिल्लीच्या कसोटीत विराटने २४३ आणि ५० धावा केल्या. तीन कसोटी सामन्यांमधून ६०० पेक्षा जास्त धावा करणारा विराट हा पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या