कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू, बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

146
virat-kohli

सामना ऑनलाईन, मुंबई

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’चे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले अन् त्यानंतर संघातील गटबाजी चव्हाटय़ावर आली. ‘बीसीसीआय’ने या घटनेची गंभीर दखल घेतली असून आता कोहलीला कर्णधारपदावरून हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रोहित शर्माकडे हिंदुस्थानच्या एकदिवसीय व टी-20 संघाचे नेतृत्व सोपविण्याचा विचार ‘बीसीसीआय’ करत आहे.

‘बीसीसीआय’मधील एका पदाधिकाऱ्याने ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना हे कर्णधार बदलाचे संकेत दिले आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार बीसीसीआयकडून गांभीर्याने सुरू आहे. विश्वचषक स्पर्धेतील जगज्जेतेपदाचे स्वप्न भंगल्यानंतर आता आगामी स्पर्धांसाठी ‘टीम इंडिया’ची मोर्चेबांधणी सुरू करायची आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहितकडे कर्णधारपद दिले जाण्याचे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो संघाचं नेतृत्व करू शकतो, तर कोहलीकडे कसोटी संघाची धुरा कायम ठेवली जाऊ शकते, असे पदाधिकाऱ्याने सांगितले.

रोहित शर्मा हा ‘टीम इंडिया’चे नेतृत्व करण्यासाठी सध्या सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. रोहितने एकदिवसीय संघाची धुरा खांद्यावर घ्यावी. सध्या यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. रोहितने नेतृत्व स्वीकारल्यास आगामी वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्डकप आणि 2023 मध्ये मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या तयारीसाठी त्याला पुरेसा वेळ मिळेल, अशा शब्दांत पदाधिकाऱ्याने रोहितला समर्थन दिले. संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट असल्याच्या चर्चा अतिशय त्रासदायक असून त्या अफवा आहेत. ‘बीसीसीआय’च्या प्रशासन समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय हे लवकर एक बैठक घेणार असून त्यात संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr, कर्णधार विराट कोहली व संघ निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद सहभागी होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक निर्णयांवरुन मतभेद असल्याचे समोर आले आहे. टीम इंडियामध्ये गटबाजी सुरू असून कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr यांच्या एककल्ली कारभारावर आणि संघ निवडीवर काही खेळाडू नाराज होते. संघाला विश्वासात न घेता कोहली आणि शास्त्र्ााRनी काही निर्णय घेतले. यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरणावर आणि संघातील एकीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याची चर्चा आहे.

टीम इंडियाची निवड 19 जुलैला

हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जात असून या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड 19 जुलैला करण्यात येणार आहे. विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात येणार असून शिखर धवनच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबतही अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहेत. आगामी दौऱ्यात हिंदुस्थानच्या संघात युवा खेळाडूंना संधी मिळेल अशी चर्चा रंगू लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या