पंतला वर्ल्डकपच्या संघात स्थान का नाही? कोहलीने केला खुलासा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसीच्या क्रिकेट विश्वचषकाला 30 मे पासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या 12 व्या वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. क्रिकेट विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या हिंदुस्थानच्या संघाबाबत अद्यापही मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. धोनीसोबत दिनेश कार्तिकला यष्टीरक्षक घेतल्याने व पंतला वगळल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. पंरतु आता कर्णधार विराट कोहलीने याचा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना विराट म्हणाला की, दिनेश कार्तिककडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर विषम परिस्थितीमध्ये तो संघाला विजयाचा मार्ग दाखवण्याची शक्यता आहे. हेच कारण आहे की पंतला संघामध्ये स्थान मिळाले नाही. तसेच स्पर्धेदरम्यान धोनी काही कारणास्तव खेळू शकला नाही तर यष्टीरक्षणासाठी कार्तिक चांगला पर्याय असेल. दिनेश कार्तिक एका चांगला फिनिशर म्हणूनही आपला खेळ उंचावत आहे, असेही कोहली म्हणाला.

कोहलीच्या वक्तव्यामुळे शक्यता मावळली
क्रिकेट विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये 23 मे पर्यंत बदल करण्याची मुदत आहे. परंतु कोहलीने केलेल्या वक्तव्यामुळे आता पंतला संघात स्थान मिळण्याची शक्यता पूर्ण मावळली आहे. याआधी पंतला पर्यायी खेळाडू म्हणून निवड समितीने पसंती दिली होती. एखादा खेळाडू स्पर्धेतून बाहेर गेल्यास त्याच्या जागी पंतला सर्वात प्रथम संधी मिळेल, असे निवड समितीने सांगितले होते.