कर्णधारपद धोक्यात आल्याने कोहलीचा ‘विराट’ निर्णय,विंडीज दौऱ्यावर जाणार

40

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ‘टीम इंडिया’चे आव्हान संपुष्टात आले. त्या पराभवाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील मतभेदाने ‘टीम इंडिया’तील दुफळी चव्हाटय़ावर आली. आता आपले कर्णधारपद जाणार अशी कुणकुण लागल्याने विराट कोहलीने वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

विश्वचषक स्पर्धेतील पराभव, ‘टीम इंडिया’तील गटबाजीच्या बातम्या, कर्णधार विराट कोहली व संघप्रशिक्षक रवी शास्त्री यांची मनमानी या पार्श्वभूमीवर आता मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी व कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार बीसीसीआयकडून सुरू आहे. त्यामुळे एकदिवसीय व टी-20 संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे जाऊ शकते, तर कोहलीकडे कसोटी संघाची धुरा कायम ठेवली जाऊ शकते,’ असे ‘बीसीसीआय‘च्या पदाधिकाऱ्याने सांगितल्याने ‘टीम इंडिया’त उलथापालथ होणार हे सर्वांना कळून चुकले आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी विराट कोहली व जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असे वृत्त होते, मात्र आपल्या कर्णधारपदावर गंडांतर येणार याची चाहूल लागताच विराटने विंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

आपली प्रतिक्रिया द्या