धोनी निवृत्त होणार? विराटच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण

1237

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केलेल्या या पोस्टमुळे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे. कारण विश्वचषक झाल्यापासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. विंडीजविरुद्ध झालेल्या दौऱ्यामधूनही धोनीने माघार घेतली होती. त्यामुळे धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली होती.

विराट कोहलीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोत तो स्वत: डोक्याला बॅट लावून जमिनीवर बसल्याचे दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला धोनी ग्लोव्हज सांभाळताना दिसत आहे. 2016 मध्ये टी-20 विश्वचषकादरम्यान मोहालीत झालेल्या सेमीफायनलमधील हा फोटो आहे. या फोटोला विराटने ‘एक असा सामना जो मी कधीही विसरू शकत नाही. ती रात्र विशेष होती. या माणसाने (धोनी) मला खूप पळवले होते जसे काय माझी फिटनेस टेस्ट सुरू आहे’, (‘एक ऐसा गेम जिसे मैं कभी नहीं भूल सकता, बेहद खास रात, इस इंसान ने मुझे ऐसे दौड़ाया था जैसे मेरी फिटनेस टेस्ट ले रहा हो।’), असे कॅप्शनही दिले आहे.

2016 मध्ये टी-20 विश्वचषकादरम्यान मोहालीत सेमीफायनलमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना झाला होता. या सामन्यात टीम इंडियापुढे विजयासाठी 161 धावांचे आव्हान होते. रोहीत, धवन, रैना आणि युवराज झटपट बाद झाल्यानंतर विराट आणि धोनीने किल्ली लढवला होता. विराटने नाबाद 82 आणि धोनीने 10 चेंडूत 18 धावा चोपत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात धोनीने वयाच्या 35 शीमध्येही विराटला धावा काढताना दमवले होते. सामना संपल्यानंतर विराट बॅट डोक्याला लावून खाली बसला होता आणि धोनीने त्याच्या जवळ जात शाबासकी दिली होती. हाच फोटो विराटने ट्वीट केला आहे. यावरून धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे.

आज पत्रकार परिषद?
दरम्यान, विराटच्या ट्वीटमुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच आज तो पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. सायंकाळी पत्रकार परिषदेत धोनी निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विराटच्या ट्वीटमुळे नेटिझन्सने देखील त्याला तो निवृत्त होत आहे का? असा सवाल केला आहे.

शानदार कारकीर्द
महेंद्रसिंह धोनीने कसोटीमध्ये 2014 सालीच निवृत्ती घेतली होती. 2005 ते 2014 दरम्यान खेळलेल्या 90 कसोटीत धोनीने 4876 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 6 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. 224 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आतापर्यंत 350 एकदिवसीय लढतीत त्याने 10 शतक आणि 73 अर्धशतकांसह 10773 धावा चोपल्या आहेत. नाबाद 183 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर 98 टी-20 लढतीत 1617 धावांची नोंद धोनीच्या नावावर आहे. धोनीच्याच नेवृत्वाखाली टीम इंडियाने 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 ला एक दिवसीय विश्वचषक जिंकला होता. तर कसोटीमध्ये पहिले स्थानही पटकावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या