रामायणातील ‘त्या’ प्रसंगातून मिळाली बॅटिंगची प्रेरणा, सेहवागने शेअर केला फोटो

टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग एकदा पाय रोवून उभा राहिला की भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. एका जागेवर उभा राहून चेंडूला आसमान दाखवण्याचे विरुचे कसब खास होते. चौकार आणि षटकार यांची तर आतिषबाजी व्हायची. यामागे रामायणातील एका प्रसंगातून आपल्याला प्रेरणा मिळाली असे सेहवागने म्हंटले आहे. विरूने या प्रसंगाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वीरेंद्र सेहवागने रामायणातील एका दृष्याचा फोटो शेअर केला आहे. राम-रावणातील युद्धापूर्वी बालीपुत्र अंगद रावणाच्या सभेत त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करायला जातो. यावेळी अंगद भर सभेत पाय रोवून उभा राहतो आणि पाय हटवण्याचे आव्हान देतो. परंतु रावणाच्या दरबारातील रथी-महारथी त्याचा पाय यत्किंचितही हलवू शकत नाही. हाच फोटो विरुने शेअर केला आहे.

फोटोसोबत त्याने लिहिले की, ‘मला रामायणातील याच प्रसंगातून फलंदाजीची प्रेरणा मिळाली. पाय हटवणे कठीण नाही तर अशक्य आहे.’ टीकाकार नेहमीच सेहवागच्या फुटवर्कबाबत टीका करतात. वीरूने या फोटोतून टीकाकारांना याचेच उत्तर दिले आहे.

लॉकडाऊनमुळे ‘रामायण’चे पुनःप्रसारण
कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्व मालिकांचं शूटिंग रद्द करण्यात झाले आहे. अशा परिस्थितीत दूरदर्शनने रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ ही मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला ही मालिका देशात सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका असून टीआरपीचे नवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या