५३ तासांचा भीमपराक्रम

67

आसावरी जोशी, [email protected]

शेफ विष्णू मनोहर सलग ५३ तास स्वयंपाक करण्याचा अनोखा विक्रम त्यांनी नुकताच रचला. गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली. त्यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा

रुबाबदार, गदाधारी भीम… मुष्टियोद्धय़ाखेरीज भीमाची अजून एक अत्यंत प्रचलित ओळख म्हणजे एक निष्णात बल्लव. ‘कीचकवध’ या खूप जुन्या मराठी चित्रपटातील एक दृश्य लहानपणापासून मनावर कोरले गेले आहे… विराटाच्या पाकशाळेत भीम बल्लव म्हणून रुजू होतो आणि सगळ्या कसलेल्या बल्लवांना अगदी गप्प करून टाकतो. एका क्षणात तो पाकशाळेचा ताबा घेतो आणि एखाद्या कसलेल्या मल्लासारखा तो तिथेही वावरू लागतो. भल्या मोठय़ा पाटय़ावर भल्या मोठय़ा मसाल्याचा गोळा वाटून तो बसल्या जागेवरूनच चुलीवरच्या मोठ्ठय़ा पातेल्यात चेंडूसारखा टाकतो… जणू काही गोळाफेकच करीत आहे. बल्लवाचा तो दणदणीत, सहज वावर आणि पदार्थांची अप्रतिम चव यामुळे तो विराटाच्या पाकशाळेतील अज्ञातवासातील रूपातही स्वतःची छाप सहजच सोडतो.

मला हे दृश्य आठवण्याचे कारण म्हणजे शेफ विष्णू मनोहर यांनी नुकताच केलेला ५३ तास स्वयंपाक करण्याचा विक्रम… अमेरिकेतील एका बल्लवाने सलग ४० तास स्वयंपाक करण्याचा विक्रम केला होता. पण तो मोडीत काढत शेफ विष्णू यांनी सलग ५३ तासांच्या विक्रमावर स्वतःचे स्वतंत्र नाव कोरले आणि एक वेगळा विक्रम रचला. त्याची नोंद गिनिज बुकमध्येही झाली.. एका मराठमोळ्या बल्लवाने रचलेला हा पहिला विक्रम… विष्णूजींचा त्या व्यासपीठावरील वावर मला भीमाची आठवण देऊन गेला… आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचा मोह आवरला नाही…

आपल्या या ५३ तासांच्या विक्रमाविषयी बोलताना शेफ सांगतात की, माझ्या या विक्रमाचे श्रेय मी माझ्या आईला आणि पत्नीला देतो. कारण माझ्या आईने मला सांगितले होते की, कोणत्याही क्षेत्रात जा पण त्यात नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न कर. माझ्या पत्नीचेही तेच म्हणणे होते. मला स्वतःला आईच्या संस्कारांमुळे नेहमीच काहीतरी वेगळे करायला आवडते. त्यामुळे हे करण्याचे ठरवले. ४० तासांचा विक्रम डोळ्यासमोर होता. आपल्याकडे यात अजून कोणीही हात घातलेला नाही. मग विचार केला यातच काहीतरी नावीन्यपूर्ण करावे. गेल्या दीड वर्षांपासून हे प्रपोजल आमच्याकडून गेलेले होते. दोन वेळेला ते परत आले आणि तिसऱयांदा मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचे मुख्य कारण होते- आम्ही संपूर्णतः शाकाहारी पदार्थ करणार होतो. मला एक वर्षाचा वेळ दिला गेला. आणि मुदतीचा कालावधी आता या उन्हाळ्यात संपत होता. या दिवसात नागपुरात तापमान असते 46 अंश. पण मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. आम्ही एकूण १२०० पाककृती काढल्या. त्यातील ७५० निवडल्या गेल्या. यात जास्तीतजास्त मराठी पाककृती असण्यावर आमचा भर होता. त्यावेळेस विष्णूजींचे एकूण १२० जणांचे पथक कामाला लागले होते. १२ लोकांचे पथक केवळ स्वयंपाकघराचे काम सांभाळत होते.

त्या ५३ तासातील विश्रांतीच्या कालखंडाविषयी बोलताना शेफ विष्णू यांनी सांगितले की, मी सलग सव्वा दोन दिवस स्वयंपाक करीत होतो. एका तासामागे मला पाच मिनिटे विश्रांती मिळायची. सलग आठ तास स्वयंपाक करून मी ४० मिनिटे मिळवायचो. त्यात आन्हिके उरकणे, पायाला मसाज करून घेणे, थोडीशी विश्रांती घेणे असे मी करायचो. पण यातूनही माझी विश्रांतीची २२ मिनिटे शिल्लक राहिली. या सलग उभे राहाण्याच्या कौशल्याचे श्रेय विष्णूजी सातत्याने करीत असलेल्या टीव्ही शोजना देतात. तेथे सतत १२-१५ तास उभे राहावे लागत असल्याचा फायदा त्यांना येथे झाला. शिवाय सतत प्रवासात असताना विमानतळावरील फूड जॉइंट्समध्येही विष्णूजींनी सराव केला.

घराचा स्वयंपाक आणि सातत्याने करीत असलेला रेस्टॉरंटमधील स्वयंपाक याविषयी बोलताना ते म्हणाले की, या दोन्हीची तुलना होऊ शकत नाही. घरातील स्वयंपाकास आई, आजीचा गंध असतो… त्यात त्यांचे प्रेम असते. आमच्या स्वयंपाकातही आपुलकीचा सुवास असतो… पण घराच्या अन्नाची किमया वेगळीच असते… ते अन्न संस्कार देते… आपल्याला घडवते…. या आगळ्यावेगळ्या प्रयोगातून विष्णूजी शाकाहार हाच सर्वोत्तम आहार असा प्रसार केला आहे.

आजच्या फिटनेसच्या युगात आणि स्वतः घराच्या अन्नाचे भोक्ते असलेले विष्णूजी सांगतात की, प्रत्येकाने फिटनेसची काळजी घेतलीच पाहिजे… फक्त महिन्यातून एकदा विरंगुळा वा रुचीपालट म्हणून रेस्टॉरंटमध्ये जायलाच हवे… यातून घराच्या अन्नपूर्णेला नवनवीन कल्पना सुचतात… घरात ते पदार्थ करून पाहिले जातात..

शेवटी आपण रेस्टॉरंटमध्ये का जातो… किंवा बाहेर का खातो… चव बदलावी… आप्तस्वकीयांबरोबर थोडा वेळ मिळावा… आजच्या तरुण पिढीला विष्णूजी सांगतात की, मस्त खा… मस्त राहा… त्याचबरोबर स्वतःच्या फिटनेसची काळजी घ्या… आपल्या कामात सातत्याने प्रयोग करीत राहा… अजून काय लागते. यश मिळविण्यासाठी!

मधुर वडा

साहित्य.. मैदा २ वाटय़ा, बारीक चिरलेल्या भाज्या १ वाटी (गाजर मटार, फ्रेंचबिन्स, फ्लॉवर), बारीक चिरलेला कांदा १ वाटी, ओल्या खोबऱयाचे तुकडे ४ चमचे, भाजून भिजवलेली उडदाची डाळ २ ते ३ चमचे, भिजवलेली चणाडाळ ३ चमचे, ठेचलेली हिरवी मिरची ३ चमचे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर ४ चमचे, तेल तळायला, सोडा किंचित, किसलेलं आलं२2 चमचे.

कृती,,सर्व जिन्नस एकत्र मिसळून ८ ते १० मिनिटे ठेवा. नंतर दोन प्लॅस्टिक पेपरमध्ये थोडे मोठे चपटे (साधारण पुरीपेक्षा थोडे मोठे) बडे थापा. मंच आचेवर कडक तळा, खोबऱयाच्या चटणीबरोबर खायला द्या.

कैरी भात

साहित्य..तयार भात २ वाटय़ा, किसलेला कैरी १ वाटी, मीठ, साखर चवीनुसार, कोथिंबीर, मोहरी १ चमचा, हिरवी मिरची ४-५ लसूण १ चमचा, हळद, हिंग पाव चमचा.

कृती..भात थंड पाण्याच्या हाताने मोकळा करून त्यात किसलेली कैरी, मीठ, साखर, कोथिंबीर एकत्र करून घेणे. त्यानंतर कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण घालून परतणे, गॅस बंद करून त्यात हळद व हिंग घालणे, नंतर ही फोडणी तयार केलेल्या भातावर ओतून कालवून घेणे व नंतर सर्व्ह करणे.

 

आपली प्रतिक्रिया द्या