रामजन्मभूमी ट्रस्टमध्ये सरकार, मंत्र्यांना स्थान देऊ नका; विश्व हिंदू परिषदेची मागणी

1085

रामजन्मभूमी ट्रस्टमध्ये सरकार वा मंत्र्यांसाठी कोणतीही जागा नाही. या ट्रस्टमध्ये निर्गुण परंपरेलाही स्थान नाही. तर सगुण परंपरेचे वहन करणाऱया शैव व वैष्णवांनाच या ट्रस्टमध्ये स्थान मिळाले पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. सरकारने असा कोणताही प्रयत्न केल्यास अयोध्येत नवा वाद निर्माण होईल, असा इशाराच विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून केंद्र सरकारने अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी ट्रस्ट निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र विश्व हिंदू परिषदेने ट्रस्ट निर्माणाच्या नमनालाच विरोधात आवाज उठवला आहे. या ट्रस्टमध्ये सरकार व त्याचे कोणतेही मंत्री असता कामा नयेत, अशी धमकीच विश्व हिंदू परिषदेने दिली आहे. राममंदिराचा आराखडा तयार आहे. ट्रस्टबद्दलही आमची भूमिका निश्चित आहे, असे विहिंपचे अध्यक्ष चंपत राय यांनी सांगितले.

हिंदू धर्माविषयी आस्था असणारांनाच रामजन्मभूमी ट्रस्टमध्ये स्थान मिळावे, असे चंपत राय म्हणाले. निर्गुण परंपरा मानणाऱयांना या ट्रस्टमध्ये जागा नाही. सगुण परंपरेचे वहन करणाऱया शैव व वैष्णवानांच ट्रस्टमध्ये स्थान मिळाले पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. हिंदू धर्मीयांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्मीयाला या ट्रस्टमध्ये घेण्याचा विचार जरी सरकारने केला तरी अयोध्येत नवीन वाद निर्माण होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर असेल, असा इशाराही चंपत राय यांनी दिला. सरकारचे काम मंदिर बनवण्याचे नाही, कारण ते धर्मनिरपेक्ष असते. ट्रस्टच्या माध्यमातून सरकारने मंदिर बनवण्यासाठी पाऊल उचलले तर सरकारला मशीद बनवण्यासाठीही पुढाकार घ्यावा लागेल, असेही चंपत राय म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या