गोव्यात काँग्रेसमध्ये गळती, विश्वजीत राणेंची पक्षाला सोडचिठ्ठी

34

सामना ऑनलाईन । पणजी

गोवा विधानसभा निवडणुकीत सत्तेचा घास तोंडाजवळ येऊन देखील सत्ता गमवाव्या लागलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे गोव्यातील आमदार विश्वजीत राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या नेतृत्वावर आरोप करत पक्षाला त्यांनी ‘राम राम’ केला आहे. त्यामुळे काँग्रेस गोव्यात आणखी अडचणीत सापडली आहे.

विश्वजीत राणे यंदाच्या गोवा विधानसभा निवडणुकीत वालपोई मतदारसंघातून निवडून आले होते. ‘निवडणूक निकालानंतर पक्षाला परिस्थिती योग्यरित्या हाताळता आली नाही, त्यामुळे हे माझे बंड आहे’ असे सांगत त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळीही विश्वजीत राणे सभागृहात गैरहजर होते.

काही दिवसांपूर्वीच राणे यांनी गोवा काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळाबाबत राहुल गांधींना कळवले होते आणि तोडगा न काढल्यास पक्ष सोडण्याचा इशाराही दिला होता. अखेर ज्या वालपोई मतदारसंघातून ते विजयी झाले त्याच मतदारसंघातून सत्तारी युवा मोर्चाच्यावतीने ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नाचक्की सत्र थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र आहे.

आपली प्रतिक्रिया द्या