नासा आणि इस्त्रो अंतराळ संशोधन केंद्रांना भेट; 26 हजार 872 विद्यार्थ्यांमधून 36 विद्यार्थ्यांची होणार निवड

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी याकरिता रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील 26 हजार 872 विद्यार्थ्यांमधून 36 विद्यार्थ्यांना नासा आणि इस्त्रोची वारी करता येणार आहे. त्यामध्ये 27 विद्यार्थी हिंदुस्थानातील इस्त्रो या अंतराळ संशोधन केंद्राला तर 9 विद्यार्थी अमेरिकेतील नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट देतील.

विद्यार्थ्यांची ही निवड परीक्षेतून होणार असून 30 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. ही परीक्षा केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हास्तर अशा चार टप्प्यांमध्ये होणार आहे. नासा आणि इस्त्रो अंतराळ संशोधन केंद्रांच्या भेटीसाठी विद्यार्थ्यांमध्ये एक परीक्षा होणार आहे. विज्ञान विषयावर आधारीत ही शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. पहिली परीक्षा 30 नोव्हेंबर रोजी केंद्रस्तरावर होणार आहे. या परीक्षेला 26 हजार 872 विद्यार्थी बसणार आहेत.

त्या परीक्षेतून बीट स्तरावरील परीक्षेसाठी 2600 विद्यार्थ्यांची निवड होईल. बीट स्तरावरील परीक्षा 8 डिसेंबर रोजी होणार आहे. 2600 विद्यार्थ्यांमधून तालुकास्तरावरील परीक्षेसाठी 600 विद्यार्थ्यांची निवड होईल. ही परीक्षा 11 डिसेंबर रोजी होणार आहे. तालुकास्तरावरील 600 विद्यार्थ्यांमधून जिल्हास्तरावरील परीक्षेसाठी 90 विद्यार्थ्यांची निवड होईल. ही परीक्षा 17 आणि 18 डिसेंबर रोजी होणार आहे. अंतिम 90 विद्यार्थ्यांमधून 36 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. त्यापैकी 27 विद्यार्थी इस्त्रो या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देतील, तर 9 विद्यार्थी नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देतील. या परीक्षेमध्ये लेखी आणि मुलाखतीचा समावेश आहे. नासा आणि इस्त्रोच्या या सहलीसाठी जिल्हा नियोजनमधून 70 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.