भव्यतेची ओढ

56

आदिनाथ कोठारे… हसरा चेहरा आणि उमदं व्यक्तिमत्व… ‘जय मल्हार’, ‘बालगणेश’नंतर आता ‘विठुमाऊली’… त्यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा.

पंढरीत पाय ठेवला आणि तल्लीन झाल्यासारखं वाटलं. वारकरी विठोबाच्या भक्तीत कसे तल्लीन होत असतील याची कल्पना आली. मी ही मालिका घेऊन येथे आलोय… नकळत तल्लीन झालो. आमची ही वारीच आहे म्हणा हवं तर… आम्ही उत्सुक आहोत. प्रेक्षकही उत्सुक आहेतच… स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच सुरू झालेल्या ‘विठुमाऊली’ या मालिकेबाबत बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाले.

विठ्ठलाची गाथा सांगणं हे काम सोपं नक्कीच नाही. त्यातही मालिकेच्या स्वरूपात ते सांगणं नक्कीच सोपं नाही. ‘जय मल्हार’सारखी मोठी मालिका केल्यामुळे आपल्याला अनुभव दांडगा होता. त्यामुळेच विठ्ठलाच्या मालिकेला हात घालू शकलो, असं ते स्पष्ट करतात. ते पुढे म्हणाले की, विठ्ठल हा कुणा एका जातीचा देव नाही, धर्माचा देव नाही. कुठल्याही जाती-पंथाचा माणूस त्याच्या पायावर नतमस्तक होतोच… नव्हे व्हावंच लागतं. असा आपलासा वाटणारा देव आहे. त्याची गाथा या मालिकेतून पाहायला मिळेल. शिवाय यात आम्हाला सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराजांची साथ लाभली आहे.

विठ्ठलाचे चरित्र हे संतांशिवाय अपूर्णच… या पार्श्वभूमीवर या मालिकेत विठ्ठलासोबतच आपल्याला संतमंडळींचंही दर्शन घडू शकतं. यावर बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाले, विठ्ठलाचं असं चरित्र कुठेच नाहीय… त्यामुळे विठ्ठलाबद्दल आम्हाला खूप रिसर्च करावा लागला. विठ्ठलाचे चरित्र पूर्णपणे संतांच्या अनुभवातून आपल्याला दिसतं. संतांच्या इतिहासात विठ्ठलाचं चरित्र दडलंय. हे आम्हाला आढळलं. तसतशी गाथा बांधत गेलो. संतांच्या अनुभवातून, त्यांच्या अभंगांतून उलगडणारा विठ्ठल आम्ही या मालिकेत दाखवलेला आहे. अनेक तज्ञांची आम्हाला यासाठी मदत झाली.

कोठारे व्हिजन म्हटलं म्हणजे भव्यता… या दृष्टीने ‘विठुमाऊली’ मालिकेत स्पेशल इफेक्ट्स पाहायला मिळतील अशी प्रेक्षकांची अपेक्षा असणारच. यावर आदिनाथ म्हणाले, हो तर… ती तर आमची खासियतच आहे. प्रत्येक मालिकेच्या वेळी त्या त्या काळात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आम्ही वेळोवेळी वापर करत आहोतच. आताही नुकताच आलेला थ्रीडी अॅनिमेशन हा प्रकार आम्ही वापरला आहे. विठ्ठल गरुडावरून पंढरपुरात आले तो सीन आम्ही या थ्रीडी अॅनिमेशनच्या सहाय्याने क्रिएट केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या