चंद्रभागेच्या तीरावर अवतरल्या चेंजिंग रूम्स!

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

चंद्रभागा नदीच्या तीरावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने महिलांसाठी ‘चेंजिंग रूम्स’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चेंजिंग रूम्स नसल्याने महिला भाविकांची होणारी कुचंबणा दैनिक ‘सामना’ने मांडली होती. या बातमीची दखल घेत मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे.

तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर शहरातील विकासकामांवर प्रशासनाने गेल्या पाच वर्षांमध्ये २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, कोणत्या विकासकामांना प्रथम प्राधान्य द्यायला हवे याचा अभ्यास नसल्याने झालेली बहुतांश कामे निरुपयोगी ठरली आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱया एकूण भाविकांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक संख्या ही महिलांची आहे. हे वास्तव लक्षात घेऊन प्रशासनाने प्रथम प्राधान्य महिलांच्या सोयी-सुविधांसाठी द्यायला हवे होते. मात्र, तसे न घडल्याने चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी येणाऱया माता-भगिनींना उघडय़ावरच कपडे बदलावे लागत होते. महिला भाविकांची ही व्यथा आणि कुचंबणा दैनिक ‘सामना’ने चव्हाटय़ावर आणल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व नगराध्यक्षा आणि मंदिर समितीच्या सदस्या साधना भोसले यांनी चेंजिंग रूम्स लवकरच उभारू, असे आश्वासन दिले होते. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम चंद्रभागेच्या वाळवंटात सुरू झाले आहे. भक्त पुंडलिक मंदिर ते जुन्या पुलापर्यंत नदीच्या तीरावर या चेंजिंग रूम्स उभारल्या जाणार आहेत. पात्रात जास्त पाणी वाढल्यास या रूम्स अन्यत्र हलविणे शक्य होईल, असे डिझाईन या सुविधांमध्ये करण्यात आले आहे. या सुविधेमुळे महिला भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या