पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटींची मदत

461

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय मदतीसाठी हातभार म्हणून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समिती व्यवस्थापनाने 1 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर येत्या 4 एप्रिल रोजी होणारी चैत्री वारी रद्द केल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यामध्ये वाढताना दिसत आहे. त्या दृष्टीने तातडीचा खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांच्या सुरक्षतेसाठी श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर 17 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलेला आहे. कोरोनाच्या संदर्भात राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने प्रशासनास मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. पंढरपूर शहर-परिसरातील गरिब व निराधार नागरिकांसाठी अन्नाची पाकिटे पुरवली जात आहेत. राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाजी गरज आहे. ही बाब विचारात घेऊन श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी साठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जोशी यांनी दिलीय.

चैत्री यात्रा रद्द
4 एप्रिलला पंढरपूरची चैत्री यात्रा होती. या यात्रेला अंदाजे 3 ते 4 लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातून येतात. केंद्र शासनाने 14 मार्च पर्यंत संपूर्ण देशभरात लाकडाऊन केला आहे. आंतरजिल्हा प्रवास करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे अशा पार्श्वभूमीवर एवढया मोठया प्रमाणावर पंढरपूरात भाविक आले तर कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेवून मंदिर समितीने चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय आज घेतला. मात्र या कालावधीत श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार येणाऱ्या सर्व दिंडया व सर्व पायी येणाऱ्या वारकरी भाविकांनी यात्रा रद्द झाली असल्याने पंढरपूरला येऊ नये असे आवाहन हभप औसेकर महाराज यांनी मंदिर समितीच्या वतीने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या