अभिनेता विवेक ओबेरॉयची निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हजेरी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चरित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्माता संदीप सिंग हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. देशात  सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी पार पडणार आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि चित्रपटाचा निर्माता संदीप सिंग यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

अभिनेता विवेक ओबेरॉय याचे वकिल हितेश जैन यांनी “आम्ही निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटिसीला उत्तर दिले आहे. या चरित्रपटामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची भूमिका मांडली आहे” असे म्हटले आहे.

दरम्यान, ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चरित्रपटावरून अभिनेता विवेक ओबेरॉय ट्रोल देखील झाला होता. तसेच चरित्रपटाच्या नामावलीत  गीतकार जावेद अख्तर आणि गीतकार समीर यांच्या नावांचा उल्लेख होता. मात्र आपण या चित्रपटासाठी गीत लेखन केले नसल्याचे सांगत या दोघांनी त्याबाबत आक्षेप नोंदवला होता