साहित्य संमेलनाच्या आयोजनातून विवेकानंद आश्रमाची माघार

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

साहित्य संमेलनाच्या आयोजनातून विवेकानंद आश्रमाने माघार घेतली आहे. संमेलन हे कायम संस्थानिकांचे बटीक असावे असे मानणारा एक वर्ग असून त्यांना टीका करण्याची अधिक संधी मिळू नये म्हणून आम्ही या आयोजनातून माघार घेत असल्याचे हिवरा येथील विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी कळवले आहे. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाने स्थळ पाहणी करून विवेकानंद आश्रमाचे निमंत्रण स्वीकारले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विवेकानंद आश्रमात संमेलन घेण्यास विरोध केला होता.

कोणताही वाद नसलेले अखिल भारतीय विवेकानंद विचार साहित्य संमेलन आश्रमाच्या वतीने घेण्यात येणार आहे. ६, ७ तसेच ८ जानेवारीला विवेकानंद जयंतीनिमित्ताने हे संमेलन घेण्यात येणार आहे.

आश्रमाला घाई कशासाठी?
विवेकानंद आश्रमाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी माघार घेण्याची घाई कशासाठी, असा सवाल केला. स्थळ समितीच्या अहवालानंतर महामंडळाने संमेलनस्थळाची घोषणा केली आहे. संमेलनाच्या आयोजनाचे रीतसर पत्र अजून महामंडळाने त्यांना पाठवलेले नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम होत आहे का, या प्रश्नावर मात्र जोशी यांनी उत्तर देण्याचे टाळले.

आपली प्रतिक्रिया द्या