रडगाणं बंद करा अन् फिरकीचा सामना करा! रिचर्ड्स यांनीही टोचले इंग्लंडचे कान

हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यानचा तिसरा कसोटी क्रिकेट सामना दोन दिवसांच्या आत संपल्याने अहमदाबाद स्टेडियमच्या खेळपट्टीवरून उलटसुलट चर्चांना आलेले उधाण अद्यापि क्षमलेले नाही. अनेकांनी खेळपट्टीवर टीका केली, तर खेळपट्टीचे समर्थन करणाऱयांची संख्याही काही कमी नाही.

आता या वादात वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू व्हिवियन रिचर्ड्स यांनीही उडी घेतली आहे. खेळपट्टीच्या नावाने रडगाणं बंद करा आणि हिंदुस्थानी फिरकीचा सामना करा, अशा परखड शब्दात त्यांनी इंग्लिश क्रिकेटपटूंचे कान टोचले.

रिचर्ड्स यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप टाकून जबरदस्त बोलंदाजी केली. ते म्हणाले, तिसऱया कसोटी सामन्यावरून अनेकांनी मला प्रश्न विचारले. फिरकीधार्जिण्या खेळपट्टीवर टीका करणाऱयांना मी सांगू इच्छितो की, तुमच्याकडे वेगवान गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टय़ा बनविल्या जातात. अशा उसळत्या खेळपट्टीही फलंदाजांसाठी अवघड नसतात का? आता तुम्ही वेगवान खेळपट्टीऐवजी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी बघितली. तुम्हाला तेथेही खेळता यायला हवे. म्हणून पाच दिवसांच्या क्रिकेटला कसोटी असे नाव देण्यात आले आहे. तुम्ही हिंदुस्थानात जाताय म्हणजे तेथे फिरकीला साथ देणारीच खेळपट्टीवर खेळावे लागणार याची मानसिक तयारी करूनच तुम्ही दौऱयावर यायला हवे होते.

‘तिसरी कसोटी दोन दिवसात संपली म्हणून रडगाणं गात बसण्यापेक्षा इंग्लंड संघाने चौथ्या कसोटीची तयारी करायला हवी. कारण आधीच्या खेळपट्टीवर तुम्हाला चौथी कसोटी खेळायची आहे. तिसऱया आणि चौथ्या कसोटी दरम्यान मिळणाऱया वेळेचा सदुपयोग करा. फिरकी गोलंदाजी कशी खेळायची याची तयारी तुम्हाला करावीच लागणार आहे. जर मी हिंदुस्थानात असतो किंवा खेळपट्टी बनवणं माझ्या हातात असतं, तर चौथ्या कसोटीसाठी मी पुन्हा तिसऱया कसोटीसारखीच खेळपट्टी बनवली असती.’
– व्हिवियन रिचर्डस्

आपली प्रतिक्रिया द्या