पुतीन आपल्या अनौरस मुलीवर पैसे उडवतात, विरोधकाचा दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची एक अनौरस मुलगी असून ते तिच्यावर लाखो रुपये उधळतात, असा खळबळजनक दावा पुतीन यांचे राजकीय विरोधी एलेक्सी नावलनी यांनी केला आहे.

एलेक्सी यांनी एक ब्लॉग प्रसिद्ध केला असून त्यात हे खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. एलेक्सी यांच्या म्हणण्यानुसार, पुतीन यांच्याकडे 100 अब्ज रुपये किमतीचं घर आहे. त्यात स्ट्रीप क्लब, कॅसिनो, डान्स मॅट, स्पा, थिएटर अशा गोष्टी आहेत. हे घर जिथे आहे तिथे एक खासगी बंदर आहे, असं म्हटलं आहे.

यापुढे एलेक्सी म्हणतात, पुतिन यांना एक 17 वर्षांची अनौरस मुलगी आहे. या मुलीचं नाव एलिजावेता उर्फ लुईजा असं आहे. या मुलीवर पुतिन खूप पैसे खर्च करतात, असा दावा एलेक्सी यांनी केला आहे.

रशियाच्या एका गुप्त एजन्सीच्या सूत्रांनुसार, 90च्या दशकात लुईजा हिची आई स्वेतलाना ही पुतिन यांच्याकडे कामाला होती. स्वेतलाना ही सुशिक्षित होती. त्या दरम्यान तिचे आणि पुतिन यांचे प्रेमसंबंध सुरू होते. मात्र, पुतिन त्यावेळी विवाहित होते. 2003मध्ये स्वेतलाना हिने लुईजा हिला जन्म दिला.

या सूत्रांच्या आधारेच एलेक्सी यांनी हे आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 45 वर्षांची स्वेतलाना जेव्हा पुतिन यांना भेटली तेव्हा ती एक सामान्य कर्मचारी होती. पण, आज ती एक श्रीमंत महिला आहे आणि रशियन बँकेची एक शेअरहोल्डरही आहे. तिच्या या प्रगतीच्या वेगाचं रहस्य कुणालाही ठाऊक नाही. पण, मला हे ठाऊक आहे की हे सर्व पुतिन यांच्यामुळे आहे, असा दावा एलेक्सी यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या