कोट्यवधींचे आर्थिक नुकसान; व्होडाफोन, एअरटेल होणार बंद?

आर्थिक झळ सोसत असलेली टेलिकॉम कंपनी ‘व्हाडाफोन’ला आणखीन एक झटका लागला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहित कंपनीला 50921.9 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ‘एअरटेल’ला 23,045 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इतक्या मोठ्या तोट्यानंतरही या दोन्ही कंपनी हिंदुस्थानात आपला करोबर सुरू ठेवणार का? यावर संशय व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने Adjusted Gross Revenue (एजीआर) वर दिलेल्या निर्णयानंतर थकबाकीची रक्कम भरण्यामुळे या दोन्ही कंपनीच्या चालू आर्थिक वर्षात तोट्यात भर पडली आहे. व्होडाफोन, आयडिया सोबतच एअरटेलचे नुकसान हे कॉर्पोरेट इतिहासामधील सर्वात मोठे नुकसान आहे.

15 टेलिकॉम कंपन्यांवर 1.3 लाख कोटी रुपयांचे देणे बाकी 

न्यायालयाच्या निकालानंतर 15 टेलिकॉम कंपन्यांवर 1.33 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त देणे बाकी आहे. यामध्ये सर्वात मोठे नुकसान हे एअरटेल आणि व्होडाफोनचे झाले आहे. यावर एकूण 80,000 कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. ही रक्कम या दोन्ही कंपन्यांना येत्या 3 महिन्यात द्यावी लागणार आहे. एजीआरच्या टक्केवारीच्या आधारे परवाना शुल्क आणि एसयूसीची रक्कम भरावी लागते.

व्होडाफोन आयडियाचा 27,610 कोटींचा तोटा

30 सप्टेंबर 2019 पर्यंत व्होडाफोन आयडियाची लायसन्स शुल्कावरील थकबाकी 27,610 कोटी होती. तसेच त्यांच्यावर एसयूसीचे 16,540 कोटी रुपयांचे देणं बाकी आहे. एअरटेलने परवाना शुल्काची थकबाकी 16815 कोटी रुपयांसाठी आधीच तरतूद केली आहे. तर एसयूसीच्या थकबाकीसाठी त्यांनी 11,635 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या