पैशांच्या वादातून केली महिलेची हत्या, व्होडक्याच्या बाटलीवरून केला तपास

1072

पैशांच्या वादातून महिलेची हत्या करून पश्चिम बंगालला पळून गेलेल्या आरोपीच्या दहिसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. घटनास्थळी सापडलेली व्होडकाची बाटली आणि इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस परेश रोहिदासपर्यंत पोहचले. महिलेच्या घरातून चोरलेल्या पैशांतून तो विमानाने पश्चिम बंगालला गेला होता.

दहिसरच्या जनकल्याण इमारतीत नूर (नाव बदलून) ही राहत होती. पाच दिवसांपूर्वी नूर ही घरात बेशुद्ध अवस्थेत दिसली. या घटनेची माहिती समजताच दहिसर पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घरातून काही दागिने आणि वस्तू नसल्याचे तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले. दहिसर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास केला. पोलिसांना शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. तिची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय होता. पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एम. मुजावर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुरेश रोकडे, उपनिरीक्षक घार्गे यांनी तपास सुरू केला.

घटनास्थळी पोलिसांना  व्होडकाची एक बाटली आणि दोन ग्लास दिसली. त्यावरून त्या दिवशी महिलेच्या घरी कोणी तरी आले असावे असा पोलिसांनी अंदाज बांधला. त्या व्होडकाच्या बाटलीवरच्या बॅच नंबरची माहिती पोलिसांनी काढली. ती बाटली दहिसरच्या रावळपाडा येथील दारूच्या दुकानातून घेतल्याचे उघड झाले. पोलिसांना तेथे एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले. कौशल्याचा वापर करून पोलिसांनी मारेकऱ्याची माहिती मिळवली. तो पश्चिम बंगालला पळून गेल्याचे पोलिसांना समजले. दहिसर पोलिसांचे पथक तेथे गेले. तेथून परेशला अटक करून मुंबईत आणले व न्यायालयात हजर केले.

टॉवेलने गळा आवळून केली हत्या

तीन वर्षांपूर्वी परेशची नूरसोबत एका हॉटेलमध्ये ओळख झाली होती. तो तिच्या घरी नियमित जात असायचा. नूर ही परेशकडे पैशांसाठी तगादा लावत असायची. शनिवारी रात्री नूरने परेशला व्होडका घेऊन घरी बोलावले. घरी गेल्यावर त्या दोघांत वाद झाला. वाद झाल्यावर परेशने तिची टॉवेलने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर परेशने तो टॉवेल अंग पुसण्यासाठी वापरला होता.

विमानाने गेला पश्चिम बंगालला

नूरची हत्या केल्यावर परेशने तिच्या घरातून 1 लाख 20 हजार रुपये चोरले. चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असे भासवण्यासाठी त्याने तिच्या घराची चावी सोबत नेली. घराला बाहेरून टाळे लावून तो चोरीच्या पैशांतून विमानाने पश्चिम बंगालला गेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या