अखंड महाराष्ट्राचा बुलंद नारा

49

<< साहित्य कट्टा >> मेधा पालकर

संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन… राज्यातली सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवलीमध्ये साहित्य संमेलनाचा जागर  झाला. मराठी भाषेत सादर होणारे परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, संमेलनातील ग्रंथप्रदर्शन याला भेटी देण्याची उत्सुकता रसिकांमध्ये दिसत होती. कल्याण, डोंबिवलीच्या परिसरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, साहित्य रसिक संमेलनाच्या तीन दिवसात हजेरी लावताना दिसत होते. पण साहित्य संमेलनात साहित्यिक अभावानेच आढळून आले.

कवी अशोक नायगावकर, वसंत अबाजी डहाके, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, कवी अरुण म्हात्रे यांचा अपवाद वगळता साहित्यिकांची संमेलनात वानवाच दिसत होती. याच्या उलट मराठी भाषेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी साहित्य रसिकांचा उत्साह अधिक होता. यंदाच्या संमेलनातील ठळक वैशिष्टय़ांचा विचार केला तर प्रामुख्याने दिसून आले की, ‘बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ’ या मागणीने जोर धरला. आता प्रतीक्षा आहे ती हाच बुलंद नारा प्रत्यक्षात उतरण्याची.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळयात माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ‘बेळगावमधील मराठी माणूस यातना भोगत असून अक्षरशः त्यांचं प्रेत बनलं आहे. मराठी माणसाला दिलासा देणारी योजना सरकारने आखावी’ अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. तर, ‘मराठीचे मारेकरी कोण?’ या विषयावरील परिसंवादामध्येही ‘सीमा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाका ’, असा टाहो साहित्यिकांनी फोडला.  संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी साहित्य महामंडळाने संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला नाही, यावर कल्याण – डोंबिवलीचे शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्वतः उभे राहून ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह अखंड महाराष्ट्र झालाच पाहिजे’ असा रोखठोक ठराव मांडला. या ठरावाला हजारो मराठीप्रेमींनी जोरदार प्रतिसाद दिला. एकंदरीतच सीमा भागातील मराठी बांधवांची गळचेपी होत असून, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी साहित्य संमेलनात सीमावासीयांबद्दलचा आवाज बुलंद करण्यात आला.  आता हा अन्याय दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहाणार का हा खरा प्रश्न आहे?

दुसरे वैशिष्टय़ दिसून आले ते म्हणजे संमेलनाने राज्याच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या नवकवींना, साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. बऱ्याचदा निमंत्रित, मान्यवरांच्या कार्यक्रमात चांगल्या लेखकांना स्थान मिळत नाही. याची उणीव भरून काढण्यासाठी या संमेलनाने नवीन प्रयोग केला. कवी कट्टा, बोलीभाषेतील  कवितांचा कट्टा, गझल कट्टा, अभिवाचन कट्टय़ातून लेखकांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे निमंत्रितांच्या कार्यक्रमापेक्षाही या कट्टय़ांवर सादर होणाऱ्या कवितांना साहित्य रसिकांनी तुफान गर्दी करत दाद दिली. राज्याच्या विविध ग्रामीण भागात आजही जपल्या गेलेल्या मायबोलीची ओळख  बोलीभाषेच्या कट्टय़ावर  कवींनी साहित्य रसिकांना करून दिली. त्यामुळे संमेलनाला उपस्थिती लावलेल्या साहित्य रसिकांच्या स्मरणात हे संमेलन राहील.

  • नवकवींना, साहित्यिकांना या साहित्य संमेलनाने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. कवी कट्टा, गझल कट्टा, अभिवाचनाच्या कार्यक्रमांमधून अनेक चांगल्या नवकवींची ओळख झाली. या कवींची दखल घेऊन यापुढे होणाऱया साहित्य संमेलनांमध्ये नक्कीच त्यांना सामावून घेतले पाहिजे. डॉ. श्रीपाद जोशी,  अध्यक्ष-साहित्य महामंडळ
  • साहित्य संमेलनात चर्चा, परिसंवादांबरोबरच पुस्तकांकडे नजर टाकल्याशिवाय साहित्यरसिक पुढे जात नाही व यानिमित्ताने जुन्या पुस्तकांचा धांडोळा घेतला जातो. म्हणूनच कवितारतीचे दुर्मीळ अंक रसिकांपर्यंत पाहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. या संमेलनाला रसिकांचा प्रतिसाद कमी लाभला तरी रसिकांमध्ये उत्सुकता दिसून आली. दरवर्षीपेक्षा गर्दी आणि विक्री दोन्ही कमी असल्याचं चित्र यावेळी दिसत होतं. मात्र साधना प्रकाशन, राफ्टर प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, साहित्य संस्था यांनी काही महत्त्वाची पुस्तकं उपलब्ध करून दिल्याने अशा स्टॉल्सकडे गर्दी होती. खरंतर पुस्तकांच्या विक्रीनुसार पूर्णतŠ अनुमान काढता येत नाही. त्यामुळे वाचन कमी झालं आहे, या म्हणण्यात फारसं तथ्य नाही. याबरोबरच अजूनही रसिकांचा ओढा जुन्या साहित्याकडेच आहे हेही यातून पुढे आलं. सुभाष बोरसे, प्रतिनिधी – कवितारती, सुजय प्रकाशन

 

आपली प्रतिक्रिया द्या