मोदी, शहा, फडणवीसांचा घातक पायंडा, दुश्मन समजून विरोधकांवर हल्ले; संजय राऊत यांचा घणाघात

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, चिखली, सिंदखेडराजा, बुलढाणा, जळगाव जामोद, खामगाव, या विधानसभा मतदार संघाचा पक्ष संघटनात्मक आढावा मंगळवारी शेगाव येथील विश्रामगृहात घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी बुलढाणा लोकसभा क्षेत्रातील 6 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटनात्मक कार्य, बूथ कमिट्या, भगवा सप्ताह आणि संघटनेचे एकूण कार्य व ताकद याचा संपूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपवर हल्ला चढवला.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात येणार्‍या उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, संघटक, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी यांच्याकडून मतदारसंघातील माहिती जाणून घेतली. यावेळी खासदार संजय राऊत यांचेसोबत कामगार सेना चिटनीस जिवन कामत, माजी महापौर अ‍ॅड. सुहास वाडेकर हे होते. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हासंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, सहायक जिल्हासंपर्क प्रमुख छगन मेहेत्रे, दत्तात्रय पाटील, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, जालिंधर बुधवत, महिला आघाडी जिल्हा संघटीका जिजा राठोड, चंदाताई बढे, यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संजय राऊत यांनी संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गजानन महाराज संस्थानतर्फे त्यांचे स्वागत करुन त्यांचा प्रसाद, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

शेगाव येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, रवी राणा हे नेहमीच महाराष्ट्राची मजा उडवत असतात. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा झालेला पराभव ही मजा नव्हती. लोकांनी शहाणपणाने केलेलं मतदान होतं. आता त्यांनी केलेली ही मजा असेल, तर ती निवडणुकीसाठी केलेली नौटंकी आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

देशात आमदारांच्या गाड्यांवर हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अत्यंत घातक पायंडा घातला आहे. विरोधक हे राजकीय वैचारिक शत्रू नसून ते दुश्मन आहेत, असा समज करून त्यांच्यावर हल्ले, गुन्हे, आणि खटले चालवले जात आहेत. मुनव्वर फारुकी यांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत म्हणाले की, ‘स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनी मराठी माणसाची आणि मालवणी समाजाची माफी मागितली आहे. आमच्या पक्षाचे कचाकच बटन दाबा, आम्ही तुमच्या घरी स्वयंपाक करू’ असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘आम्ही त्यांची बटणं कचाकच दाबणार आहोत. तसेच त्यांचा पराभव करणार आहोत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मोदी-शहा दिल्लीत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, देश आणि राज्यात एक अत्यंत घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. आणिबाणीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला होता, असा आरोप करण्यात येतो. सध्या डिजिटल माध्यमांमध्ये जरी अनेक चॅनेल आणि वृत्तपत्रं मोदींच्या प्रभावाखाली आहेत. अनेक समाज माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.